शेतकरी कर्जमाफी व चक्काजाम आंदोलनाला बाळासाहेब थोरात व आ. तांबेचा पाठिंबा
◻️ सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या - माजी मंत्री थोरात
संगमनेर LIVE | विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक खोटी आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देणे बाकी आहे. तर, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी आश्वासन देणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तसेच दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ६ हजार रुपये अनुदान द्यावे. या मागण्यांसह विविध मागण्यासाठी होत असलेल्या चक्काजाम आंदोलनाला राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने २४ जुलै रोजी महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यासाठी सुरू होणाऱ्या चक्काजाम आंदोलनास त्यांनी पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.
या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांना मूलभूत मागण्यासाठी असलेल्या चक्काजाम आंदोलनास आपला पाठिंबा आहे. शेतकरी कर्जमाफी दिव्यांग व महिला विधवांना दरमहा ६ हजार रुपये अनुदान शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या पलीकडे २० टक्के प्रोत्साहन रक्कम व रोजगार शिक्षण आणि आरोग्य सारख्या मूलभूत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने अद्याप ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे जन आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
महायुती सरकार हे विधानसभेमध्ये अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर मिळत नाही. त्यांना २१०० रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. वस्तुस्थितीमध्ये पंधराशे सुद्धा मिळत नाही. याचबरोबर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतकरी हा मोठ्या संकटात व अडचणीत असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पूर्णपणे कर्ज माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
दरम्यान या आंदोलनाला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही पाठिंबा दिला आहे.