धर्मकार्याला आपला हात कधीच आखडता राहणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने वडगावपान येथील हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमनेर LIVE | साधू-संतांच्या शुभ आशीर्वादाने मला कमी वयात, कमी वेळेत सेवा करण्याची संधी मिळाली. ती संधी कधीही वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि साधू - संतांच्या सेवा कार्याला माझा हात कधी ही आखडता राहणार नाही. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे मळा (साईनगरमध्ये) श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्य तिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने व दहीहंडी फोडून करण्यात आली. या सांगता सप्ताह सोहळ्याला आमदार खताळ उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी जयश्रीताई थोरात, सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार खताळ यांनी तालुक्याच्या वतीने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सन्मान केला. तर, ढोक महाराज यांच्या हस्ते आ. खताळ यांचाही सत्कार करण्यात आला.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, वडगाव पान येथील साई नगर येथे गेली ४२ वर्षा पासून सातत्याने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक महाराज या सप्ताहसाठी येत आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. माझी आई नित्यनेमाने पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर ची प्रत्येक वर्षी वारी करत आहे. त्यामुळे आपणही या वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो आहे. रामराव महाराज ढोक यांच्या प्रबोधनात्मक किर्तनातून खऱ्या अर्थाने समाजाला दिशा मिळते. मी अनेक वेळा त्यांच्या कीर्तन व प्रवचनांचा लाभ घेतला आहे. अशा अखंड हरिनाम सप्ताहतील प्रवचन आणि कीर्तनातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यातून तरुण वर्गाला एक वेगळी दिशा मिळत असल्याचे आमदार खताळ म्हणाले.