जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांना मिळणार परदेश अभ्यास दौऱ्याची संधी
◻️ तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातून पाच शेतकरी निवडले जाणार असून त्यात १ महिला शेतकरी, १ पुरस्कार प्राप्त शेतकरी व ३ इतर शेतकऱ्यांचा समावेश असेल. इच्छुकांनी ३० जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
दौऱ्यासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे असावे. तो स्वतःच्या नावे जमीनधारक असावा. उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतीच असावे, याची स्वयंघोषणा द्यावी. तसेच चालू सहा महिन्यांचा ७/१२ उतारा, आधारकार्ड, रेशनकार्ड, डॉक्टरकडून दिलेले शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र व वैध पासपोर्टची प्रत अर्जासोबत जोडावी.
यापूर्वी शासनाच्या मदतीने परदेश दौरा केलेला नसावा, तसेच उमेदवार कोणत्याही नोकरीत किंवा वैद्यकीय, विधी, अभियांत्रिकी अशा व्यवसायात नसावा. कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार आहे. निवडीनंतर वैद्यकीय तपासणी व कोरोना अहवाल देणे बंधनकारक राहील.
अर्ज व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही बोराळे यांनी केले आहे.