भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महीन्यात पूर्ण केला - मंत्री विखे पाटील 
◻️ भोजापूर चारीच्या पाण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थिती पूजन
◻️ तिगाव येथे मंत्री विखे पाटील यांचे भव्य स्वागत आणि बैलगाडीतून मिरवणूक 
संगमनेर LIVE | भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महीन्यात पूर्ण केला. चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजूरी देणार असून, भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात झाल्याने या भागाचा पाणी प्रश्न  कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षानंतर आलेल्या पाण्याचे पूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार अमोल खताळ, भोजापूर चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष किसनराव चत्तर, भाजपाचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, विठ्ठलराव घोरपडे, भीमराज चत्तर, प्रांताधिकारी अरूण उंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
याप्रसंगी तिगाव येथे मंत्री विखे पाटील यांचे भव्य स्वागत करून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्याच वतीने मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात मंत्री मंत्री विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी याठिकाणी येवून चारीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने पूर चारीचे रखडलेले काम पूर्ण झाले. प्रत्यक्षपणे पाणी आल्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून दुष्काळी भागातील गावांना पाणी देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जलसंधारण विभागाकडे असलेली भोजापूर चारी जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्याने चारीच्या कामाला गती येईल. पाणी आल्याने चारीच्या विस्तारीकरणाची केलेल्या मागणीबाबत विभागाने यापुर्वीच निर्णय करून ३० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला असून त्याला लवकर मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय केला आहे. भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी या प्रकल्पात करण्यात आला असून यामुळे ३३ हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळू शकेल याचे प्रकल्प अहवाल पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
भोजापूर चारीच्या संदर्भात काही गावांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवून देण्यात आले. यातून तालुक्यातील लोकांना काहीही मिळणार नाही. काही गावांचा समावेश करू नये म्हणून कोणी पत्र दिले याची सर्व माहीती माझ्याकडे आहे असे सूचक विधान करून ज्यांनी फक्त आश्वासन दिली टॅकरने पाणी आणून टाकले त्यांना जनतेने उत्तर देवून टाकले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात नवा आशय प्राप्त होत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोजापूर चारीचा प्रश्न सुटला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील जनतेला केवळ आश्वासन देणारी माणस आज उघडी पडली आहेत. स्वःताला जलनायक म्हणून घेणारे आज खलनायक ठरले आहेत. पाण्याच्या प्रश्नावरून विखे पाटील यांना बदनाम करणाऱ्यानी लक्षात घ्यावे की, निळवंडे आणि भोजापूरचे पाणी विखे पाटील यांनीच आणून दाखवले. भविष्यात तालुक्यातील रस्ते रोजगार आणि पाण्याचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी किसन चत्तर, अभियंता सोनल शहाणे यांची भाषण झाली.
तळेगाव प्रमाणेच साकूर आणि पंचक्रोशीतील गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योजना तयार केल्या असून त्याचीही सुरूवात लवकरच होईल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
 
