तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना महत्वाची - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर खुर्द येथे विविध प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आणि सुशोभीकरण कार्यक्रम
संगमनेर LIVE | भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. मानवता हा आपला धर्म आहे. मात्र काही लोक भगवा, हिरवा, निळा असे ध्वज घेऊन जातीभेद निर्माण करू पाहत आहे. अशा शक्तींना रोखत प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले असून आपण राजकारण हे कायम तत्त्वासाठी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी केले असल्याचे म्हटले.
आज संगमनेर खुर्द येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक व सभागृह सुशोभीकरण व हजरत पीर शाह शिबली चिश्ती शहीदाचे सुशोभीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार सत्यजीत तांबे, अजय फटांगरे, विजय राहणे, संतोष मांडेकर, सरपंच श्वेता मंडलिक, उपसरपंच गणेश शिंदे, वैशाली सुपेकर, शैला देशमुख, गुलाब शेख, माजी सरपंच सावरग्या शिंदे, हरिभाऊ मंडलिक, सुभाष पाटील गुंजाळ, अरुण गुंजाळ, नवनाथ आरगडे, मुजबिल बागवान, लतीफ बागवान, भाऊसाहेब बुरकुले, सोपान गोफने, पंढरीनाथ बलसाने, विलास आव्हाड, वरूण गुंजाळ, रमेश गुंजाळ, राजेंद्र देशमुख, किसन सातपुते, सुभाष आव्हाड, प्रकाश आव्हाड, सचिन टपले, अमोल टपले, लिलाबाई टपले, अकबर शेख, उत्तम टपले यांच्या सह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर खुर्द हे छोटे भारताचे रूप असून सर्व जाती धर्माचे लोक येथे एकत्र नांदत आहे. भारतामध्ये विविधता आहे. तिरंगा ध्वजामध्ये भगवा, हिरवा, सफेद आणि निळा रंग आहे त्यामुळे आपली प्राथमिकता तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना असली पाहिजे.
विविधता व एकता जपताना सर्व जाती धर्माच्या लोकांनी मानवता धर्म सांभाळायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदत होते. मराठा हा शब्द एका जातीसाठी नसून महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असून इंग्रजांविरुद्ध लढणारे उमाजी नाईक हे क्रांतिवीर आहे. सर्व महापुरुष, संत, समाज सुधारक हे एका जातीचे नसून ते सर्वांचे आहे.
आपण सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. जेथे टँकर जात होते तेथे आज पाणीच पाणी आहे. दुष्काळी तालुका हा विकसित तालुका बनवला. मात्र सोशल मीडियाच्या भूलथापांमुळे लोक कामे विसरत असल्याची खंत व्यक्त करताना एकेकाळी दंगलीचे शहर असलेल्या संगमनेरला शांतता सुव्यवस्थेचे शहर आपण बनवले. मागील काही काळापासून शहरात आणि तालुक्यात दादागिरी आणि दहशत वाढते की काय अशी भीती निर्माण झाली असून पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी ते विकसित तालुका हा प्रवास संगमनेरचा राहिला आहे. प्रवरेचे पाणी उचलण्याचा हक्क स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी जनतेला मिळवून दिला. तर, बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मोठमोठे विकास कामे मार्गी लावली. ९ लाख लिटर दूध उत्पादन आणि आर्थिक समृद्ध असलेल्या तालुका बनवला. माजी मंत्री थोरात यांनी ४० वर्ष खूप काम केले. लोकशाहीमध्ये सत्ता परिवर्तन होत असते.
जनतेच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेमध्ये आहे. कोणतेही काम करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वाशी चांगले संबंध असल्याचे सर्वाना माहिती आहे. तालुक्यातील जनतेने काळजी करू नका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाचे कोणतेही काम तातडीने मार्गी लावण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. चाळीस वर्षे जपलेली चाळीस वर्षाची सुसंस्कृत परंपरा आपल्याला जपायची आहे. ही परंपरा बिलकुल आपण खराब होऊ देणार नाही असे सांगताना विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी सर्वानी माजी मंत्री थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी गणेश शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ गुंजाळ यांनी केले. सुभाष पाटील गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांची भव्य मिरवणूक अभूतपूर्व काढून स्वागत केले. युवकांची मोठी उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राहिले.