महामंडळ योजनांच्या लाभासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनो नोंदणी करा
◻️ प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांचे आवाहन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.
या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.
सभासद नोंदणी करताना वाहनमालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी माहिती भरून आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करावी.
अर्जातील माहिती तपासून, सर्व अटींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जातो. अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘कार्यालयाशी संपर्क साधा’ असा संदेश प्राप्त होतो. अशा वेळी संबंधित परिवहन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी.
नोंदणी व ओळखपत्रासाठी ५०० रुपये आणि सभासद शुल्क ३०० रुपये असे एकूण ८०० रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.