गरीबांना त्याच्या हक्काचे घर मिळवून देणे हेच पुण्यकर्म - डाॅ. विखे पाटील

संगमनेर Live
0
गरीबांना त्याच्या हक्काचे घर मिळवून देणे हेच पुण्यकर्म - डाॅ. विखे पाटील 

◻️ सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे केले वाटप

संगमनेर LIVE (शिर्डी) | शिर्डी परिसरातील सावळीविहिर बुद्रुक येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणं हेच खरे माणुसकीचं काम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

सावळीविहीर बुद्रुक येथील अतिक्रमिक ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचा हस्तांतरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्लॉटच्या उताऱ्याचे वितरण देखील करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, सरपंच उमेश जपे, आप्पासाहेब जपे, बाळासाहेब जपे, विकास जपे, शांताराम जपे, रावसाहेब देशमुख, राजू जपे, रूपाली आगलावे तसेच शासकीय अधिकारी व लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, “हा कार्यक्रम एक दिवसात झाला नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, विरोधकांच्या टीका सहन करत, आपण केवळ आश्वासन न देता कृती केली. जात, धर्म, पक्ष न पाहता फक्त गरज पाहून हे वाटप केले गेले. ही आमच्या कार्यपद्धतीची ओळख आहे.”

सोमया फॅक्टरी येथील जमीन ४०० कुटुंबांना घरकुलसाठी जागा मिळावी यासाठी सोमया शेठ यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच ते प्रश्न मार्गी लावून संबंधितांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्लॉट हस्तांतरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. यामध्ये कोणत्याही पुढाऱ्याच्या नातेवाईकांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही, हे सांगताना ते म्हणाले, या जमिनीवर एकाही पुढाऱ्याचा नातेवाईक नाही, कारण आमचं धोरण स्पष्ट आहे गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे.

डॉ. विखे पाटील यांनी पुढील टप्प्यांबाबतही घोषणा केली. या नव्या वसाहतीत अंगणवाडी, समाजमंदिर आणि मोफत लग्न सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मोफत वाळू ग्रामपंचायतीमार्फत दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. विखे म्हणाले, शिर्डीमध्ये कायदा - सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. गावातील प्रत्येक महिला - मुलगी रात्रीही सुरक्षिततेची पूर्ण खात्री घेऊन वावरू शकेल, असा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे.

आज गरीबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमचं खरे यश आहे. हे राजकारणासाठी नाही, तर माणुसकीसाठी केलं आहे, असे भावनिक उद्गारही त्यांनी शेवटी काढले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !