उद्या कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे नाशिक येथे उद्घाटन
◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते आणि मंत्री गिरीष महाजन उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE (लोणी) | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळ मुक्त करण्याचे पुढचे पाऊल म्हणून गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाच्या अंतर्गत ‘कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प’ कार्यालय नाशिक येथे सुरू होत आहे.
कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. नाशिक येथील सिंचन भवन परिसरात उद्या रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या कार्यक्रमास अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरु झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला आहे.
या प्रकल्पाची काम योग्य समन्वय आणि संपर्कातून मार्गी लागावीत म्हणून मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे ही भूमिका जलसंपदा विभागाने घेतली. त्यानूसार नाशिक येथे नदीजोड कार्यालय जलसंपदा विभागाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध विभागात नदीजोड प्रकल्पाच्या कामांचे सर्वेक्षण आणि आराखडे तयार करण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले असून, त्याच्या यशस्वी अंमलबजावणी करीता नव्याने सुरू होत असलेले कार्यालय उपयुक्त ठरणार आहे.