अमृतवाहिनीचा गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे देश पातळीवर मोठा लौकिक
◻️ माजी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा ४८ वा स्थापनादिन उत्साहात
संगमनेर LIVE | शेतकरी व बहुजन समाजातील विद्यार्थ्याना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे याकरता स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची १९७८ मध्ये स्थापना केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेल्या या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशात मोठ्या पदावर कार्यरत असून हे संस्थेचे खरे मोठे भांडवल आहे. आगामी काळात नवनिर्मितीसह अमृतवाहिनी विद्यापीठ होण्यासाठी वाटचाल सुरू असून असून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे अमृतवाहिनी संस्थेचा देश पातळीवर मोठा लौकिक झाला. असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या ४८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. विश्वस्त लक्ष्मणराव कुटे, तुळशीनाथ भोर, ॲड. आर. बी. सोनवणे, विलास वर्पे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, संचालक डॉ. जे. बी. गुरव यांच्यासह सर्व प्राचार्य उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाची सुविधा व्हावी याकरता स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. याचबरोबर आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे याकरता अमृतवाहिनी या संस्थेची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी १९८३ मध्ये विनाअनुदानित तत्त्वावर इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक महाविद्यालये सुरू झाली. त्याच वेळेस भाऊसाहेब थोरात यांनी अगदी छोट्या शेड मधून सुरू केलेले हे महाविद्यालय आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
गुणवत्ता पूर्ण शिक्षण, शिस्त, चांगले वातावरण, नवनवीन योजना, उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट ची सुविधा यामुळे अमृतवाहिनीचा देश पातळीवर आता मोठा लौकिक झाला असून अनेक माजी विद्यार्थी राज्यात देशात व प्रदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. देशामध्ये अनेक जण विविध राज्यांचे प्रमुख म्हणून काम करत आहेत याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. हे सर्व माजी विद्यार्थी संस्थेचे भांडवल आहे. आजही त्यांना संस्था, व्यवस्थापन याबद्दल आदर असल्याने ते कोठेही असले तरी, अमृतवाहिनीचा विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान बाळगतात.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना तालुक्यातील जनतेने त्यांना दिलेल्या लोक वर्गणीतून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट स्थापन झाले. आज आरोग्य क्षेत्रातील राज्यातील प्रथम क्रमांकाचे हे हॉस्पिटल सेवा देत आहे. संगमनेर मध्ये शिक्षणातून मोठी क्रांती झाली अमृतवाहिनी मध्ये केजी टू पीएचडी सर्व शिक्षणाची सुविधा असून आगामी काळामध्ये नवनिर्मितीसह संशोधन वाढवणे गरजेचे आहे. याचबरोबर इंजीनियरिंग, फार्मसी ऑटोनॉमस झाले असून आगामी काळामध्ये अमृतवाहिनी विद्यापीठ करण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे आज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दुष्काळी तालुका ते विकसित तालुका या प्रवासाचा इतिहास प्रत्येकाने नेहमी आठवला पाहिजे. दादांनी पाया घातला आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हा तालुका फुलला. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण हे अमृतवाहिनीचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे ते म्हणाले.
सौ. शरयू देशमुख म्हणाल्या की, ४८ वर्षाच्या वाटचालीमध्ये सर्वाच्या सहयोगातून आज अमृतवाहिनी देशपातळीवर गुणवत्तेची संस्था म्हणून ओळखली जात आहे. देशात आणि परदेशात अनेक माजी विद्यार्थी असून सर्वाचे संस्थेची भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. यावेळी मॉडेल स्कूल मधील बालपणीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या तर, अमृतवाहिनी हा परिवार असून आगामी काळामध्ये सर्वानी अधिक गुणवत्ता पूर्ण काम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आजचा हा क्षण सर्वासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. चांगले वातावरण शिस्त आणि गुणवत्ता यामुळे पालकांची प्रवेशासाठी पहिले प्राधान्य ही अमृतवाहिनी राहिले असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. मनोज शिरभाते, विलास भाटे, सौ. जे. बी. सेठी, आशिष कुमार, अंजली कन्नावार, स्नेहल शेकदार, नामदेव गायकवाड आणि सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त सौ शरयू देशमुख यांनी केले. तर प्रा. जी. बी. काळे यांनी आभार मानले.