गणेश उत्सव हे आनंदाचे पर्व निसर्गाशी नाते सांगणारे - बाळासाहेब थोरात
◻️ गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | गणेश उत्सव हा आनंदाचा व श्रद्धेचा विषय आहे. हा सणांचा काळ आनंदाचे पर्व असून या काळात आरोग्याची हानी होणार नाही याकरता डीजे, लेझर किरण व गुलालाचा वापर टाळून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. असे आवाहन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रभा निवासस्थानी गणेशाची आरती बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी समवेत सौ. कांचनताई थोरात, डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. वर्षा तांबे, विजय राहणे, शरद बटवाल, बाबासाहेब कडनर, नितीन अभंग, ज्ञानेश्वर राक्षे यांच्यासह संगमनेर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव आणि गणेश उत्सव सुरू झाले. सर्वांनी एकत्र येऊन हे उत्सव आनंदाने साजरे करायचे आहे. खरे तर हे आनंदाचे पर्व आहे. गणेश उत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा विषय आहे. मात्र या काळामध्ये आरोग्याची हानी होणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
विशेषतः डीजेचे आवाजाने मोठ्या प्रमाणात शरीराचे नुकसान होते. त्याचप्रमाणे लेझर किरणांनी डोळ्यांचे नुकसान होते. गुलालने फुफुसाला त्रास होतो. त्यामुळे तरुणांनी यांचा वापर टाळला पाहिजे. गणेश उत्सव हे निसर्गाशी नाते सांगणारा उत्सव आहे. त्यामुळे आपण आनंद साजरा करताना पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा होईल ही काळजी घ्यावी. याचबरोबर या आनंद काळामध्ये नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले की, सर्वानी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा आहे. यामध्ये लहान, थोर, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद नाही. एकत्र येण्याची ही मोठे माध्यम असून सर्व धर्म समभाव जोपासण्याची परंपरा गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्वानी जोपासली पाहिजे. याचबरोबर आनंद साजरा करताना युवकांनी अति उत्साह टाळा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे व डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सर्वाचे स्वागत केले.