हिवरगाव पावसा येथे जागा उपलब्ध करा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू - आमदार खताळ
◻️ घारगाव ते हिवरगावपावसा ३३ केव्ही विजवाहिनीचा शुभारंभ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या गावांमध्ये आपण भविष्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू आणि त्या माध्यमातून या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता येईल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील घारगाव ते हिवरगाव पावसा ही ३३ केव्ही उपकेंद्रापर्यत टाकलेल्या उच्चदाब वाहिनी केंद्राचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महावितरणचे अधिकारी, स्थानिक प्रतिष्ठित नागरीक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, घारगाव ते हिवगावपावसा ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनी आल्यामुळे परिसरातील हिवरगाव पावसा, सावरगाव, रायतेवाडी, झोळे, देवगाव, शिरापूर, निमगाव टेंभी, पिंपळगाव माथा, खांडगाव या गावाला पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे. त्यामुळे पद्मनगर भागातील विज उपकेंद्रातील भागाचा लोड आता कमी होण्यास मदत होणार आहे, असे म्हणाले.
हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थान विकासासाठी आत्तापर्यंत आपण मोठ्याप्रमाणात निधी दिला आहे. हे मंदिर क वर्ग दर्जात घेतले आहे आणि ब वर्ग दर्जामध्ये सुद्धा आपणच घेणार आहे. या साठीचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलेला प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असून तो सुद्धा लवकरच मंजूर करून ५ कोटी रुपयाचा निधी या मंदिर परिसराच्या विकासासाठी मिळणार आहे. काहीनी तर ११ लाख रुपयांची गडबड करून या देवस्थानवरती आपले वर्चस्व सिद्ध केले. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्या वर कारवाई करण्यासाठी आपण स्वतः देवस्थानच्या बाहेर आंदोलन करू. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, तमाशा कलावंत पवळाबाई हिवरगावकर यांच्या स्मारकासाठी निधीची मागणी आपण सरकारकडे केली आहे. तो ही निधी लवकरात लवकर उपलब्ध होईल, असे सांगितले.
घारगाव ते हिवरगाव पावसा वीज वाहिनीचे काम सुरू असताना अनेक अडचणी आल्या. मात्र आमदार खताळ यांच्या माध्यमातून त्या दूर झाल्या. या वीज वाहिनीमुळे सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, रायतेवाडी, देवगाव या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अशी माहिती महावितरणचे धनंजय खैरनार यांनी दिले.