..तुमचे योगदान काय? चारीच्या कामात एक खडा तरी, उचलला का?
◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल
◻️ भूलथापाना लवकरच उत्तर देण्याचा बाळासाहेब दिला इशारा
संगमनेर LIVE | दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र, तुमचे या चारीमध्ये योगदान काय? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना विचारला आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता १९७७ मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. १९९४ मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली. १९९६ मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले.
हे पाणी पुढे तिगाव माथापर्यत नेता येईल, याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. २००६ मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. २ ऑक्टोंबर २००६ मध्ये येथे पाणी पूजन केले.
मी, जलसंधारण मंत्री असताना २००८ मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे, व लांबी करता ५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तिगाव, वरझडी या गावांकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली.
२०२१ मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक, चिंचोली गुरव, देव कवठे पर्यत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले. हे जनतेला माहित आहे.
आपण आपणही अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले. या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का? असा सवाल विचारताना नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती. काम कोणी केले कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहित आहे. खोट्या भूल थापा आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून ही भ्रम निर्माण केला जात आहे.
यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली. मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापुर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का? असा सवाल करताना या चारीच्या कामात आपले योगदान काय? असा परखड सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व नवीन लोकप्रतिनिधी आमदार खताळ यांना विचारला आहे.
कितीही भूलथापा द्या लवकर उत्तर देणार..
आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले. भोजापुरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणी सर्वाना मिळाले पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम आणि प्रयत्न केले. उपेक्षित सर्वाना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या, सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.