थोरातांची पत्रकबाजी म्हणजे, अस्तित्वासाठी केलेली केविलवाणी धडपड

संगमनेर Live
0
थोरातांची पत्रकबाजी म्हणजे, अस्तित्वासाठी केलेली केविलवाणी धडपड 

◻️ आमदार अमोल खताळ यांची पत्रकानंतर बोचरी टीका

◻️ चाळीस वर्षे जनतेच्या भावनांशी खेळलात याचे आत्मपरीक्षण करा

संगमनेर LIVE | भोजापूर चारी आणि पाण्याच्या मुद्द्यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेली राजकीय टिका म्हणजे अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड आहे. ४० वर्षे सत्तेत असताना ज्यांना तळेगाव निमोण आणि पठार भागातील जनतेला पाणी देता आले नाही. त्यांना महायुती सरकारने आठ महीन्यात भोजापूर चारीसाठी केलेल्या कामावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. स्वःताच्या राजकीय फायद्यासाठी दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळू  न देता त्यांच्या भावनांशी खेळलात म्हणूनच जनतेने तुम्हाला सुध्दा घरी बसवले. काम करणाऱ्यावर टिका करण्यापेक्षा केलेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करा. आशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी थोरातांच्या पत्रकबाजीचा समाचार घेतला.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, मला निवडून येवून आठ महीने झाले. तरी मी राज्य सरकारकडे काहीना काही पाठपुरावा करून भोजापूर चारीसह तालुक्यातील अन्य  काही प्रश्न मार्गी लावत आहे. मग तुम्हाला जनतेन चाळीस वर्षे संधी दिली, तुम्हाला भोजापूर चारीला पाणी देता का आले नाही? निसर्गाने साथ दिली म्हणून भोजापूरला पाणी आले असे तुमचे म्हणणे असेल तर, चाळीस वर्षात पाऊस झालाच नाही का? भोजापूर धरण भरले नाही का? चाऱ्याची कामे करण्याचा केवळ राजकीय फार्स केला का? याची उत्तरं आधी फसवलेल्या जनतेला माजी आमदार थोरातांनी द्यायला हवीत.

 केवळ स्वःताच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी दुष्काळी पट्ट्यातील जनतेला तहानलेले ठेवून त्यांचे शोषण करणे आणि मतांसाठी राजकारण करणे हाच तुमचा चाळीस वर्षाचा अजेंडा होता. नुसत्या चारी खोदून पाणी येत नाही, त्यासाठी प्रामाणिक नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती लागते, जी तुमच्याकडे कधीच नव्हती. तुम्हाला समाजकारणापेक्षा राजकारण आणि स्वतःच्या संस्थाचा फायदा कसा होईल यातच जास्त रस होता. 

फक्त चाऱ्याची कामे काढायची ठेकेदार पोसायचे. एवढेच काम सुरू असल्याने जनतेच्या व्यथा तुम्हाला कधीच समजल्या नाहीत. दुष्काळी भागातील जनता तुमच्या आशा वागण्याबद्दल काय प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत याचा कानोसा घ्यावा, यामध्ये तुमच्या आजू - बाजूला फिरणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुध्दा आहेत, याची जाणीव ठेवण्याचा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.

आमदार खताळ यांनी पुढे सांगितले की, गेल्या आठ महिन्यांत आम्ही भोजापूर चारीच्या दुरुस्तीसाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी अथक परिश्रम घेतले. मे-जूनच्या पावसाने धरण भरले, पण त्याला आमच्या नियोजनाची आणि जलसंधारण विभागाशी समन्वयाची जोड होती. आम्ही निधी मंजूर करून चारीच्या दुरुस्तीला गती दिली, स्थानिक यंत्रणांसह काम केले आणि पाणी निमोण, पारेगाव, तळेगाव, तिगाव, वरझडी या गावांपर्यंत पोहोचवले. 

तुम्ही ४० वर्षात जे करू शकला नाहीत, ते आम्ही आठ महिन्यांत करून दाखवले. तुमच्या खोट्या आश्वासनांनी आणि लोकांच्या भावनांशी खेळण्याच्या राजकारणाने जनता वैतागली, म्हणूनच लोकांनी तुम्हाला घरी बसवले. तुम्ही असो किंवा तुमचा भाचा असो, आम्ही जे कुठले काम करू, जे सकारात्मक बदल घडवू, त्याचे श्रेय घेण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करता, आणि लोकांची दिशाभूल करताय. पण धडपड केवळ अस्तित्वासाठी आहे, हे समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.

तुम्हाला खरंच लोकांविषयी तळमळ होती, त्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा होती, तर ४० वर्षे का काम केले नाही? तुम्ही फक्त ठराविक लोकांची, तुमच्या बगलबच्च्यांची प्रगती केली, हे कटू सत्य संगमनेरकर जाणतात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही तालुक्यातील  प्रत्येक गावात आता उघडे पडला आहात. काळजी दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी संगमनेरकरांनी तुम्हाला चांगलेच ओळखले होते. त्यामुळे सूज्ञ जनतेची फार दिशाभूल तुम्ही आता करू शकणार नाही. 

तळेगाव, निमोणच काय पठार भागातील प्रत्येक गावाला पाणी मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले. भोजापूर चारी आणि निळवंडे धरणाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. तुमच्या खोट्या भूलथापांना आणि बनावट श्रेय घेण्याच्या खेळाला आता जनता बळी पडणार नाही. आमच्या कामाचे परिणाम जनतेसमोर आहेत, आणि सत्य कधीच लपत नाही. तुमच्या खोट्या टीकेला जनताच उत्तर देईल! असे खताळ शेवटी म्हणाले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !