कलावंत सन्मान योजनेचा इष्टांक वाढवण्यासाठी विखे पाटील यांचा पाठपुरावा
◻️ मुख्यमंत्री फडणवीस आणि सांसकृतिक कार्य मंत्री शेलार यांची घेतली भेट
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक कलावंत सन्मान योजनेचा इष्टांक खास बाब म्हणून वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांसकृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून अहिल्यानगर जिल्ह्यात कलेचा वारसा जोपासणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने योजनेचा लाभ सर्वाना मिळू शकत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्यातील १४ तालुक्यात विविध गावांमध्ये लोककलावंताचे वास्तव्य आहे. यामध्ये वासुदेव, पिंगळा, जोशी, गोंधळी, भराडी, आराधी, गारुडी कोल्हाटी, डोंबारी, डक्कलवार, भोपे, भुत्या, तमाशा कलावंत, संगीत बारी, नाट्य कलावंत, आदिवासी लोकनृत्य करणाऱ्या कलाकारांनी परंपरेने कलांची जोपासना करीत आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे.
राज्य सरकारच्या वतीने या कलाकारांसाठी राजर्षी शाहू महाराज वृध्द कलावंत मानधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी फक्त १०० कलाकारांची योजनेचे लाभार्थी म्हणून निवड होते. अहिल्यानगर जिल्ह्यात कलावंताची संख्या जास्त असल्याने या योजनेचा लाभ सर्व गरजू लाभार्थीना मिळावा म्हणून योजने करीता सध्या फक्त १०० इतकाच असलेला इष्टांक वाढवून तो २०० करावा आशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून केली आहे.
अहिल्यानगरची भूमीतील कलाकारांनी आपल्या कलाविश्वातून जिल्ह्याचे नाव नेहमीच मोठे करण्यासाठी योगदान दिले आहे. त्याच्यातील कलागुणांचा योग्य सन्मान होण्यासाठी राज्य सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावून देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.