संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनीतील नोंदीबाबत आमदार खताळ यांचा पुढाकार
◻️ महसूल मंत्र्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी भागात येणाऱ्या सिटी सर्व्हे नं. १६५० ई या मिळकतीवर नियंत्रित ‘सत्ताप्रकार ब’ ही नोंद असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील स्थानिक रहिवाशांना शासकीय सुविधा, मालकी हक्क, कायदेशीर व्यवहार, बँक कर्ज, पाणी-जोडणी, नळपट्टी, घरपट्टी यामध्ये गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची आमदार अमोल खताळ यांनी दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे हे प्रकरण मांडत, सदर नियंत्रित ‘सत्ताप्रकार ब’ नोंद रद्द करण्याची विनंती केली आहे.
बैठकीचे आदेश देण्याचा मंत्र्यांचा निर्णय..
आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सिटी सर्व्हे नं. १६५० ई वरील नोंदींचा सखोल आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंजाबी कॉलनीतील अनेक कुटुंबांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“पंजाबी कॉलनीमधील स्थानिक रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून या अडचणीला सामोरे जात आहेत. सत्ताप्रकार 'ब' नोंदीमुळे त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाहीत. मी स्वतः महसूल मंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या प्रकरणात तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मला खात्री आहे की, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.