निरोगी मन व तंदुरुस्त शरीरासाठी खेळ आवश्यक - डॉ. सुधीर तांबे
◻️ सहकार महर्षी कृषी महाविद्यालयात आयोजित टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत ९ जिल्ह्यातील ५५० खेळाडूंचा सहभाग
संगमनेर LIVE | राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत सुविधा देणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरविभागीय टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत ९ जिल्ह्यातील ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून निरोगी मन व तंदुरुस्त शरीरासाठी खेळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी द्रोणागिरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. तांबे बोलत होते.
विद्यापीठाची डीन डॉ. एस. बी. खरबडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. एस. बी. भनगे, क्रीडा अधिकारी डॉ. व्हि. आर. आवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्हि. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, डॉ. व्हि. डी. वाळे आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर ते नंदुरबार या नऊ जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
डॉ. तांबे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषि क्षेत्र अनन्यसाधारण महत्त्वाचे असून या क्षेत्रामध्ये डॉ. स्वामीनाथन यांनी मोठी क्रांती घडवली देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. इंदिरा गांधी यांनी कणखर भूमिका घेत अमेरिकेला खडसावले. देशाला अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉ. स्वामीनाथन, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून मोठे काम झाले. हरित क्रांतीनंतर डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी धवल क्रांती घडून आणली.
संगमनेर तालुक्यामध्ये थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण विकास साधताना धवल क्रांती मधून शेती व्यवसायाला जोड दिली. आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातून ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. आगामी काळामध्ये शेतीला व्यवसायाला व्यवसायिक रूप देणे. उत्पादकता वाढवणे आणि विषमुक्त अन्नधान्य निर्माण करणे हे आव्हाने नवीन युवकांसमोर असल्याचे सांगताना प्रत्येकाने एक तरी खेळ खेळला पाहिजे, खेळाची आवड जोपासली पाहिजे. कारण निरोगी मन आणि तंदुरुस्त शरीरासाठी खेळ ही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. खरबडे म्हणाले की, थोरात कृषि महाविद्यालयाने कमी काळामध्ये अत्यंत चांगले काम केले असून कृषी विद्यापीठ कायम या महाविद्यालयाच्या पाठीशी आहे. प्रत्येकासाठी व्यायाम आणि खेळ महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यानी मोबाईलमध्ये न अडकता खेळ खेळलेच पाहिजे. याकरता प्रत्येक महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. भणगे म्हणाले की, खेळामधून शरीराचा व्यायाम होतो. निरोगी शरीरासाठी व्यायाम गरजेच असून प्रत्येकाने खेळ ही आवड जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. आर. बी. उंबरकर, डॉ. ए. एल. हारदे, प्रा. डी. आर. मगदूम, प्रा. एस. जी. वरखड, प्रा. एस. ए. खर्डे, प्रा. ए. एस. ससे आदींसह टीम मॅनेजर व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर, प्रा. जी. बी. बाचकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. स्वामीनाथन यांना जयंतीनिमित्त अभिवादन..
हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या १०० वी जयंती निमित्त आज सर्वत्र शाश्वत शेती हा दिन साजरा होत असून त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, विद्यापीठाचे डिन डॉ. एस. बी. खरबडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून डॉ. स्वामीनाथन यांना मानवंदना दिली.