लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींच्या विरोधात क्रांतीचा नारा देण्याची गरज
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ९ ऑगस्ट क्रांती दिनी प्रतिपादन
संगमनेर LIVE | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट क्रांती दिनी ‘चले जाओ’ चे मोठे आंदोलन झाले. देश स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी हुतात्मे पत्करले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना आली. मात्र ज्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. ते लोक आज जातीभेदाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज आहे देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची याकरता या लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींविरोधात क्रांतीचा नारा देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर शहरातील नेहरू चौक येथील अशोक स्तंभास क्रांती दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी संगमनेर शहरांमध्ये भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ९ ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो’ हे आंदोलन या दिवशी सुरू झाले. संपूर्ण देश पेटून उठला. नंदुरबारचा अकरा वर्षाचा शिरीष कुमार देशाचा झेंडा घेऊन निघाला. यावेळी त्याच्यावर ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या. अनेक क्रांतिवीर, देशभक्त यांच्या त्यागातून आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यघटना मिळाली गरिबाला मताचा अधिकार आला.
मात्र, सध्या देशांमध्ये जातीयवादी शक्ती दिशाभूल करत आहे. ज्या शक्तींनी कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. यांच्यापैकी कोणीही तुरुंगात गेले नाही. आज मात्र, दुर्दैवाने ती लोक जातीभेदाच्या नावावर राजकारण करत आहे. देशाची दिशाभूल करत आहे.
यापुढील काळामध्ये देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे असून लोकशाही विरुद्ध असलेल्या या विघातक शक्ती विरुद्ध क्रांतीचा नारा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकी मध्ये ८ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाची दिशा ठरली त्याच रात्री सर्व राष्ट्रपुरुषांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले. जनता मात्र पेटून उठली. चले जाव ही मोठी लोकचळवळ उभी राहिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्यामधून हे स्वातंत्र्य मिळाले. मात्र हे स्वातंत्र्य आणि लोकशाही सध्या धोक्यामध्ये आली असून ही लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने लढावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सर्व मान्यवरांनी अशोक स्तंभाला अभिवादन केले. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून मेन रोड बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्थानक परिसरामध्ये भव्य प्रभात फेरी संपन्न झाली.