दूध उत्पादकांनी लंम्पी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे - रणजितसिंह देशमुख
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांनी याबाबत सतर्क राहून रोग निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधून वेळीच औषधोपचार करून घ्यावेत, तसेच दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. ते दूध संघात स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांचे आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शासनाने लम्पी आजारावरील लस त्वरीत उपलब्ध करून द्यावी व लम्पी आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा कमी-अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या त्वचेवर २ ते ५ से.मी. आकाराच्या घठ्ठ गाठी निदर्शनास येणे, डोके, मान, पाय, कास तसेच तोंडात, घश्यात, श्वास नलिकेत पुरळ व फोड येणे, जनावरांचे पाय, मान यावर सुज येणे, डोळ्यामध्ये जखमा होणे ही लम्पी रोगाची लक्षणे आहेत.
स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांचा आढावा घेतांना देशमुख यांनी तालुक्यातील सर्वच गावात एकाच दिवशी गावातील संपुर्ण जनावरांना जंतनाशक औषध पाजणेबाबत सुचना केल्या.
गो-वंश हत्या बंदी कायद्याबाबद लोकभावना अधिक तीव्र होत चाललेल्या आहेत. तसेच या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. देशी गाईंचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मात्र संकरीत भाकड जनावरे व गोऱ्हे याबाबत गो-वंश हत्या बंदी कायद्यात शासनाने आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आवाहनही देशमुख यांनी केले.
या प्रसंगी दूध संघाचे संचालक प्रमोद पावसे, डॉ. सुजित खिलारी, डॉ. विजय कवडे यांच्यासह तालुक्यातील राजहंस दूध संघाचे स्वयंरोजगार केंद्राधिकारी उपस्थित होते.