मत चोरीचा आरोप करणाऱ्यांना जनतेनेचं झटका दिला - उपमुख्यमंत्री

संगमनेर Live
0
मत चोरीचा आरोप करणाऱ्यांना जनतेनेचं झटका दिला - उपमुख्यमंत्री 

◻️ संगमनेर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विरोधकांचा समाचार तर, विविध विकास योजनांची घोषणा 

संगमनेर LIVE | अमोल खताळ यांना आमदार करणारी जनता ही खऱ्या अर्थाने जायंट किलर आहे. तालुक्याच्या प्रश्नासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी उभी राहाणार असून, आमचा महायुतीचा आमदार हा सेवा करणारा आहे. व्होट चोरीचा आरोप करणाऱ्यांना जनतेने चारशे चाळीस व्होल्टचा झटका देवून दूर केले आहे. आता महायुती सरकार लाडकी बहिण योजनेसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महायुतीच्यावतीने संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविजयी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील नगरपालिकेच्या संदर्भात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला तातडीने मंजूरी देण्याची घोषणा केली. तसेच तालुक्यातील युवकांच्या रोजगाराकरीता औद्योगिक वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उलपब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. 

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री म्हणाले की, संगमनेरात आज जनतेचा महासागर लोटला आहे. स्वाभिमानाने आणि अभिमानाने आलेली ही जनता आहे. या जनतेने आमदार अमोल खताळ यांच्यासारखा सामान्य माणूस आमदार म्हणून निवडून पाठविला. लाडक्या बहिणींचे आणि भावांचे यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे. “एक ही मारा लेकीन सॉलीड मारा” असा टोला लगावून शिंदे म्हणाले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण करते आणि २० टक्के राजकारण करते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेवून जात आहे. 

मागील अडीच वर्षापूर्वी राज्यातील जनतेशी बेईमानी करुन काहींनी महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र अडीच वर्षात हे सरकार आम्ही उलथून टाकून “टांगा पलटी घोडे फरार” केला. अडीच वर्षांच्या काळात राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही काम केले. सर्वसामान्यांसाठी योजना राबविल्या, ज्यांनी लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घातला त्यांना जनतेने जोडा दाखविला. काँग्रेससारखी जाहीरनाम्यात आमची प्रिंटींग मिस्टेक होत नाही. मी कमिटमेंट केली की “मै खुद भी नही सुनता” असे सांगून लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही शेतकऱ्यांना महायुती सरकार लवकरच दिलासा देईल. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टिका करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभेला निगेटीव्ह नॅरेटीव्ह निर्माण करुन यश मिळाले तेव्हा एव्हीएम मशिन चांगले होते. निवडणूक आयोगही चांगला होता. मात्र विधानसभेत पराभव झाला, तर लगेच एव्हीएम यांच्या दृष्टीने वाईट झाले. राहुल गांधींची अवस्था म्हणजे “येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस” अशी झाली असल्याची टीका करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन पाकिस्तानला गोळीचा जवाब गोळ्याने दिला. पण याच ऑपरेशन सिंदूरवर विरोधक आज संशय व्यक्त करत आहे. विरोधकांची बोलीही पाकिस्तानची असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी आपल्या भाषणात केली.

विधानसभा निवडणूक जिंकली, आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्याला जिंकायच्या आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया या तालुक्यात सुरु झाली आहे. विखे पाटील यांनी शब्द पाळून या तालुक्यात परिवर्तन घडवून दाखविले. असा आवर्जुन उल्लेख करत “निळवंडे आणि भोजापूरचे पाणी आता आले आहे”. तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी लवकरच औद्योगिक वसाहतीची प्रक्रीया सुरु करण्याच्या प्रक्रीया मी देणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही देतानाच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आ. अमोख खताळ यांनी आपल्या भाषणात केलेल्या मागणीनुसार शहरातील कॉटेज रुग्णालयात महिलांचे आणि बालकांचे स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रीया लवकरच करणार असल्याची त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी संगमनेरात घडलेल्या घटनेचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. वारकरी सांप्रदाय ही राज्याची ताकद आहे. यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात साधूंची हत्या झाली, आम्ही वारकऱ्यांचा सन्मान करणारे आहोत. “गर्वसे कहो हम हिंदू है” हा विचार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिला, तो विचार आम्ही पुढे घेवून जात आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितले. कारखाना दूधसंघ यांचेच मलई हे खाणार जनतेला काय धतुरा का असा सवाल शिंदे यांनी आपल्या भाषणात केला.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील दहशत आता जिंकली असून, सर्वसामान्यांसाठी आता आम्ही काम करत आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया तालुक्यात सुरु झाली असून, चाळीस वर्षानंतर या तालुक्यातील जनतेने मोकळा श्वास घेतला आहे. महायुती सरकारमुळे तालुक्यातील वातावरण आता बदलत आहे. शहर आणि तालुक्यातील विकासासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नांना महायुती सरकारने साथ द्यावी अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रोड शो करुन नागरीकांच्या स्वागताचा स्विकार केला. उत्फुिंर्तपणे त्यांनी जनतेत जावून त्यांची निवेदनं स्विकारली. शहरातील नवीन नगर रोड आणि जाणता राजा मैदानाकडे सर्व रस्त्यांवर उत्फुर्तपणे नागरीकांनी उपमुख्यमंत्र्यांचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. विशेष म्हणजे आमदार अमोल खताळ यांच्या कुटूंबीयांनी सभास्थानी जतनेमध्ये हजेरी लावली. वारकऱ्यांचा सत्कार करुन उपमुख्यमंत्र्यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेला समर्पक उत्तर दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !