शेतकऱ्यांच्या जीवनात बैल पोळ्याचे मोठे महत्त्व - बाळासाहेब थोरात
◻️ बाळासाहेब थोरात यांच्या संत सावली निवासस्थानी बैल पोळा उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचे पशुधन हे त्याचे सर्वस्व असते. पशुधनावर प्रेम करणारा शेतकरी हा सर्वाचा पोशिंदा असून त्याच्या जीवनामध्ये बैलपोळ्याचे महत्त्व मोठे असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
जोर्वे येथील संत सावली निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. कांचनताई थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात यांसह जोर्वे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जीवनामध्ये पशुधन अत्यंत मोलाचे असते. पुरातन काळापासून शेती कामासाठी बैलाचे मोठे योगदान राहिले आहे. शेतकऱ्यांचा मोठा जीव बैलामध्ये असून आजचा दिवस हा त्याचा सन्मान करण्याचा आहे. लहान थोरांमध्ये या सणाबाबत मोठा उत्साह असतो.
काळानुसार या सणांमध्ये बदल जरी झाला तरी बैलपोळ्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. कृषि औद्योगिक क्रांतीच्या धोरणानंतर सध्या सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जात आहे. अशा यांत्रिक युगातही शेतकऱ्यांचे पशुधनावरील प्रेम कायम आहे. शेतकरी कुटुंबामध्ये गाई बैल दारासमोर असणे ही मोठी प्रतिष्ठा असते.
मात्र सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत असून त्याच्या शेतीमालाला भाव नसतो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे ही आमची सातत्याने मागणी असून या सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे. अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे.
आपण राज्याचे कृषिमंत्री पद सहा वर्षे सांभाळले असून शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका घेतली. कृषिमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी केला असून शेतकऱ्याला सरकारने मदत केली पाहिजे हा आपला कायम आग्रह राहिला आहे.
याचबरोबर ज्या भागांमध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये चांगला पाऊस होऊन शेतीमध्ये समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी केली.
दरम्यान यावेळी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात बैलपोळा जोरवे गावासह सर्वत्र साजरा करण्यात आला.