कार्यकाळात तालुक्यातील विविध देवस्थानांना आदर्श बनवले - बाळासाहेब थोरात
◻️ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुख - समृद्धीसाठी खांडेश्वर चरणी केली प्रार्थना
संगमनेर LIVE | यावर्षी अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरी, पर्जन्य छायेच्या प्रदेशात कमी पाऊस आहे. या भागातही चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी व नागरिक सुखी समाधानी होऊ दे, सर्वत्र बंधुभाव वाढू दे. अशी मागणी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी खांडेश्वर चरणी केली. महादेव देवस्थानांसह सर्व देवस्थानांना सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आदर्शवत बनवल्याचे सांगितले.
चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त बाळासाहेब थोरात यांनी खांडेश्वर येथे विधिवत पूजा करून प्रार्थना केली.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, खांडेश्वर हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला. ग्रामस्थांनी व विश्वस्त मंडळांनी त्याचा आदर्शवत वापर करून हा परिसर अत्यंत चांगला बनवला. शहरासह अनेक नागरिकांचे हे श्रद्धास्थान असल्याने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात या सगळ्यांची चांगली सुविधा येथे केली आहे.
तालुक्यातील खांडेश्वर, बाळेश्वर, निझर्नेश्वर, रामेश्वर, दुधेश्वर या सर्व महादेवांच्या बरोबरच विविध धार्मिक स्थळांना आपण सातत्याने निधी देऊन तेथील विकास कामे केली आहे. हा परिसर आदर्शवत बनवला.
देवस्थाने हा सर्वाच्या श्रद्धेचा विषय आहे. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून मानवता व माणुसकी धर्म वाढवण्यासाठी कायम काम केले आहे. तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांसाठी सातत्याने मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून सुशोभीकरणासह विविध कामे मार्गी लागली. मात्र काही लोक आता धर्माच्या नावावर राजकारण करत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. धार्मिक पीठावरून राजकारण कोणी करू नये असे आवाहन करताना जनतेच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.