राष्ट्र प्रथम या भूमिकेचे जाज्वल्य उदाहरण ऑपरेशन सिंदूर - कर्नल अभिषेक पटवर्धन
◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर व्याख्यान संपन्न
संगमनेर LIVE (नगर) | भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि बलाढ्य दल मानले जाते. त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हे नेहमीच जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. राष्ट्ररक्षणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहिम हे त्याचेच जाज्वल्य उदाहरण आहे. असे प्रतिपादन कर्नल अभिषेक पटवर्धन यांनी केले.
नामदार विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर विशेष व्याख्यान व सैन्य अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कर्नल अभिषेक पटवर्धन पुढे म्हणाले, देशाच्या सीमांवर सुरक्षा धोक्यांत घालणे आणि नागरिकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. प्रतिकूल हवामान, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि शत्रूच्या डावपेचांना तोंड देत भारतीय जवानांनी दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सेना व हवाईदलाचा अचूक समन्वय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि काटेकोर रणनितीमुळे मोहिम यशस्वीरीत्या पार पडली. सैनिकांच्या शिस्तीने, संघ भावनेने आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर खरी शौर्यगाथा लिहिली गेली.
या पराक्रमामुळे तरुण पिढीला नवी प्रेरणा मिळाली असून देशवासीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे. “राष्ट्र प्रथम” ही भूमिका अंगीकारणारे सैनिक हेच खरे राष्ट्राचे आधारस्तंभ असल्याचे या मोहिमेने पुन्हा अधोरेखित केले.
सैन्यदल केवळ सीमांचे रक्षण करत नाही तर आपत्तीच्या काळात मदतकार्य, नैसर्गिक संकटांचा मुकाबला आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्याची जबाबदारीही पेलते. ऑपरेशन सिंदूर ही मोहिम त्याच भूमिकेचे द्योतक ठरली आहे.
याप्रसंगी ब्रिगेडियर पी. सुनील कुमार (सेना मेडल अँड बार), कमांडंट, मेकॅनाईज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांनी विद्यार्थ्याना देशसेवा, शिस्त व आधुनिक सैनिकी तंत्रज्ञानाबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कर्नल अभिषेक पटवर्धन (कमांडिंग ऑफिसर, सी.टी. बटालियन, एम.आय.सी.&एस.) यांनी “ऑपरेशन सिंदूर” या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. त्यांच्या पत्नी श्रीमती राधिका पाटवर्धन याही उपस्थित होत्या.
ले. कर्नल मुकेश उपाध्याय (शिक्षण अधिकारी), मेजर मयंक भारद्वाज (तांत्रिक अधिकारी), नाईक सुबेदार अशीश कुमार (शिक्षण जे.सी.ओ.) तसेच एम. आय. सी. एस. चे जवान या व्याख्यानात सहभागी झाले.
यावेळी डॉ. पी. एम. गायकवाड (सचिव व कार्यवाहक महासंचालक प्रशासन), डॉ. अभिजित दिवटे (मेडिकल डायरेक्टर), डॉ. सुनील कल्हापुरे (टेकनिकल डायरेक्टर), डॉ. आर. के. पडळकर (मुख्य प्रशासकीय अधिकारी), डॉ. सुनील नाथा म्हस्के (डीन), डॉ. सतीश देशपांडे (वैद्यकीय अधीक्षक), प्राचार्य श्रीमती नम्रता ओहरी यांच्यासह विद्यार्थी व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.