बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज ‘सद्भावना शांती मोर्चा’
◻️ सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदायांसह नागरिक सहभागी होणार
संगमनेर LIVE | ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्ती विरोधात तमाम संगमनेरकर हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, अध्यात्मिक मंच, महाविकास आघाडी यांच्या वतीने आज गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. भव्य सद्भावना शांती मोर्चा निघणार आहे. अशी माहिती कॉग्रेस तालुकाध्यक्ष अजय फटांगरे सह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका उभा केला आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्यामध्ये संगमनेर ने दिली आहे. सर्व धर्म समभाव व वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व आहे. धर्माच्या नावाखाली काही तथाकथित कीर्तनकारांनी राजकीय अजेंडा सुरू केला असून बापू भंडारे या व्यक्तीने माजी मंत्री थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर संपूर्ण संगमनेर तालुका सह राज्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटले असून तालुक्यातील गावागावांमधील नागरिक सकाळी संगमनेर मध्ये जमा झाले.
संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा आणि संघर्षाचा तालुका आहे. शांतता व संयम ही आपली संस्कृती असून जर कोणी आमच्या शांततेवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा अनेक युवक कार्यकर्त्यानी दिला.
यामध्ये सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक मंडळे, गणेश मंडळे, संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी मंडळ, अध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, यांच्यासह साहित्य मंच, विविध महिला संघटना, पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, यांच्या कार्यकर्त्यानी या घटनेचा तीव्र निषेध करून अशा समाज विघातक शक्तीविरोधात एकजुटीने लढण्यासाठी आज गुरुवारी यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानक असे भव्य शांती मोर्चाचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्म पिठाचे नाव घेऊन जाती भेद होऊ देणार नाही. असे सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगण्यात आले असून गुरुवारी होणाऱ्या या भव्य शांती मोर्चामध्ये तमाम स्वाभिमानी संगमनेरकर, हिंदू समाज, युवक संघटना महिला संघटना पुरोगामी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सेवाभावी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
संग्राम भंडारेला शिक्षा करावी ही राज्यभरातून मागणी..
जनतेच्या श्रद्धेचा फायदा घेऊन तथाकथित कीर्तनकार म्हणून फिरणारा संग्राम भंडारे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. कोणत्याही हिंदू संघटनेने अशा वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करू नये. कारण आपला धर्म आणि वारकरी संप्रदाय असा नाही. काही लोक त्याच्या संरक्षणाची मागणी करत असून या अत्यंत चुकीचे आहे. या तथाकथित कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या राजकीय पोपट असणाऱ्या संग्राम भंडारे याला कठोर शिक्षा करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.