अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात
◻️“लाव रे तो व्हिडिओ” म्हणत घुलेवाडी षडयंत्राचा केला पडदा फाश
◻️ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार नागरिकांचा विराट मोर्चा
संगमनेर LIVE | राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे २५ हजार नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा. असे आवाहन कॉग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले.
स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील २५ हजार नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा काढला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.
नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षामध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.
नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही.
तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्याचा जो विकास झाला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचेच योगदान आहे. सर्वाना बरोबर घेऊन त्यांनी राजकारण करत हा तालुका उभा केला. हिंदुत्व धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे जातीभेद करण्याचा नाही. असे सांगताना ते म्हणाले की नवीन आमदाराने आमचे हिंदुत्व पाहू नये. हा तथाकथित कीर्तनकार नथुराम गोडसे चे उदातीकरण करत असेल तर आम्ही कदापि मान्य करणार नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे हिंदुत्ववादी आहोत. चार दिवसांपूर्वी मोर्चा केला त्यामध्ये खरे नाहीत. भाडोत्री लोक होते.
मीही आमदार आहे. कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरू नका आपल्या सर्वाना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असून मी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आमच्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत.
दरम्यान यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
शांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते गाड्या भरून संगमनेर शहरांमध्ये येत होते. मात्र, या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का? असा सवाल करताना हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला.
बाळासाहेब थोरात यांचा “लाव रे तो व्हिडिओ”
घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होते. यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले असून प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसा खोटा बोलत आहे. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही. भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत त्यांनी सर्व पुरावे सादर केले यावेळी तमाम जनतेने भंडारे याचा तीव्र निषेध केला.