डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये मुलाखती

संगमनेर Live
0
डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये मुलाखती


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | एमआयडीसी परिसरातील डॉ. विखे पाटील आयटीआय येथे विद्यार्थ्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रांजणगाव येथील एफएआयटी इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लि. यांच्या वतीने अप्रेंटिस कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. या मुलाखतीत एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. काटेकोर निवड प्रक्रियेनंतर २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कॅम्पस मुलाखतीत मोटर मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, ड्राफ्ट्समन मेकॅनिक आणि पेंटर अशा विविध ट्रेड्समधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सर्व ट्रेड्समधील विद्यार्थ्याना त्यांच्या प्रत्यक्ष तांत्रिक कौशल्ये, उद्योगमान्य ज्ञान व आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःची क्षमता दाखविण्याची संधी मिळाली.

निवड प्रक्रियेसाठी एफएआयटी कंपनीचे एचआर मॅनेजर सुभाषचंद्र चव्हाण विशेष उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याच्या तांत्रिक तयारीबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. विखे पाटील आयटीआयचे विद्यार्थी तांत्रिक दृष्ट्या मजबूत असून त्यांच्यातील शिकण्याची तयारी आणि आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. या मुलाखतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला भविष्यातील सक्षम मनुष्यबळ मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

संस्थेच्या वतीने ट्रेनिंग अँड. प्लेसमेंट ऑफिसर अरुण म्हस्के, तसेच सर्व आयटीआय शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी मुलाखतीचे संपूर्ण कामकाज पाहिले. यावेळी बोलताना प्राचार्य सूर्यवंशी म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता त्यांना आधुनिक यंत्रसामग्रीशी प्रत्यक्ष काम करण्याची संधी देणे, उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजेनुसार त्यांना घडवणे, ही डॉ. विखे पाटील आयटीआयची ओळख आहे. त्यामुळेच आमचे विद्यार्थी रोजगारासाठी तयार राहतात.”

डॉ. विखे पाटील आयटीआय हे प्रदेशातील एक महत्त्वाचे तांत्रिक प्रशिक्षण केंद्र असून येथे केवळ शिक्षणच नव्हे तर उद्योगमान्य प्रात्यक्षिक प्रशिक्षण, सुसज्ज कार्यशाळा आणि अनुभवी शिक्षकवर्गाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर दिला जातो.

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) सुनील कोल्हापुरे व डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या या यशातून संस्थेच्या तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता व उद्योगजगताशी असलेली थेट नाळ अधोरेखित होते. ही निवड केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.”

या निवडीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात काम करण्याची आणि त्यातून व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होत असून, तांत्रिक शिक्षणाचा फायदा थेट उद्योग व समाजाला पोहोचत आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !