“यात्रा काढून नव्हे तर, विकासातून देशाला एकत्रित करण्याचे काम मोदींनी केले”
◻️ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त राहाता येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ
संगमनेर LIVE (राहाता) | यात्रा काढून नव्हे तर, विकास आणि विश्वासातून भारत देशाला एकत्रित जोडण्याचे काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधकांची टिका आणि स्वंताच्या आईवर झालेल्या टिकेनंतरही कर्तव्यापासून दूर न गेलेल्या पंतप्रधान यांनी आत्मनिर्भरतेन देशाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत सुरू केलेल्या जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहीते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, कैलास कोते, कैलास सदाफळ, विजय वहाडणे यांच्यासह शासानाच्या विविध विभागांचे अधिकारी लाभार्थी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वमान्य झाले आहे. अनेक लोकाभिमुख योजनातून त्यांनी सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रीयेत आणले. आज २५ कोटी जनता गरीबी रेषेच्या वर आणण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनामुळे होवू शकले.
देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य आणि आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहे. मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात सुरू झालेली एकही योजना बंद झालेली नाही. समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळत आहे. रस्ते आणि रेल्वे विकासातून देशाला विकासाचे पर्व मोदीनी दाखवले.
पहेलगाम घटनेनंतर भारताने आपले कर्तृत्व संपूर्ण जगाला दाखवून दिले. आत्मनिर्भरतेन भारताने अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले. मोदीवर विरोधकांकडून टिका होते. त्यांच्या आईचा अपमान केला जातो पण कुठेही विचलित न होता राष्ट्राला प्रथम स्थानी नेण्याचे प्रयत्न आहेत.
भारत देश उत्पादन क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. मोबाईल पासून ते सेमीकंडक्टरच्या निर्मीतीत इतर देशांनाही भारताने मागे टाकले असल्याकडे लक्ष वेधून विखे पाटील यांनी सांगितले की, वस्तूवरील कर कमी करण्याच्या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार असून अर्थव्यवस्थेलाही मोठे पाठबळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला मोठी गती दिली असून योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी येत्या काही दिवसांत अकराशे योजनांची अंमलबजावणी आँनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला असून अहिल्यानगर जिल्हा शासन योजनांच्या अमंलबजावणीत राज्यात अग्रेसर असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. भाऊसाहेब वाकचौरे, आण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. विविध विभागाच्या योजनेतील लाभार्थीना योजनाच्या मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.