यशोधन कार्यालयाकडून १२ हजार असंघटित कामगारांना सर्वोतोपरी मदत
◻️ बाळासाहेब थोरात, आमदार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांना सर्वोतोपरी मदत
संगमनेर LIVE | माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कायम विविध योजना राबविल्या आहेत. असंघटित कामगारांना काहीही माहित नव्हते अशा वेळेस सर्वाना वेळेत निरोप देऊन घरोघर माणसे पाठवून सर्व फॉर्म नोंदवून घेतले व शासनाच्या सर्व सुविधा तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना मिळून दिलेल्या आहेत. यामध्ये यशोधन कार्यालय व माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले आहे. अशी माहिती असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी सांगितले.
तळेगाव विभागातून ज्ञानेश्वर मुंगसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २०२२ - २३ पासून असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व इंद्रजीत थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात यशोधन कार्यालयाने गावागावातील गोरगरिबांना सुविधा मिळवून दिल्या. हे सर्वांना माहित आहे. ज्यांना योजना माहीत नव्हत्या त्यांना योजनांचा लाभ मिळवून दिल्या. त्यांच्या लेकरा बाळांना शिष्यवृत्तीसाठी मदत केली. आजारपणात मदत केली. दररोज यशोधन कार्यालयात सहा कर्मचारी या गोरगरीब कामगारांना फॉर्म भरण्यासाठी सेवा करत आहेत.
मात्र सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी ज्यांना ही योजना सुद्धा माहिती नाही त्यांनी फोटो काढून खोटी प्रसिद्धी केली आहे. हे अत्यंत चुकीची आहे. तुम्ही काम करा आणि मग फोटो टाका. गोरगरिबांच्या नावाखाली राजकारण करू नका. आयत्या पिठावर रेगोटे मारण्याचे बंद करा. तुमचे एक काम दाखवा आणि फोटो काढा.
आम्ही गरीब असंघटित आहोत. स्वाभिमानी आहोत. आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही. ज्यानं काम केलं त्यांनी केलं असा मी ठामपणे म्हणतो. नवीन लोकप्रतिनिधी अमोल खताळ किंवा त्यांच्या पत्नी यांचा काहीही संबंध नाही. सत्ता तुमची आली म्हणजे फोटो लावायचे आणि बॉक्स वाटायचे पण तुम्ही फॉर्म भरले नाही मग त्यांचे फोटो छापून कसे येतात असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला.
गोरगरिबांचे कामे ही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातूनच होतात. मोठे लोक किंवा ज्यांनी कधी गरिबांना मदत केली नाही असे लोक नवीन लोकप्रतिनिधीकडे जातात. पण गरीब मात्र यशोधन कार्यालयात जातात आणि त्यांना सेवा दिली जाते. आज आमच्या मुलाबाळांना शिष्यवृत्ती मिळाली. भांडे मिळाले हे सर्व यशोधन कार्यामुळे झाले आहे आणि याला साक्ष तालुक्यातील बारा हजार लोक आहेत. त्यामुळे गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजना या यशोधन कार्यालयाच्या प्रयत्नातूनच झाले असल्याचे त्यांनी म्हटले.
१२ हजार असंघटित कामगारांना योजनांमधून मदत - कोल्हे
महाराष्ट्र शासनाचा कामगार विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील असंघटित कामगार व गोरगरिबांना कामगार कल्याण योजनेअंतर्गत लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने मदत मिळवून दिली आहे. यशोधन कार्यालयातून १२ हजार ६२७ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला असून त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, कामगार आजारी पडल्यास दवाखान्याची सुविधा, विमा अशा विविध योजना तातडीने सर्वांसाठी मिळून दिले असल्याचे असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी सांगितले.