पंचायतराज अभियानातून गावांचा सर्वागीण विकास साधा - आमदार अमोल खताळ
◻️ वडगाव पान येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा शुभारंभ
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवली जाणार आहे. या अभियानातर्गत प्रत्येक गावात विकासाची स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून आदर्श गावांची नवी परंपरा पुढे येईल त्यामुळे या अभियानामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे आणि गावाचा सर्वागीण विकास साधावा. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून वडगाव पान येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित ग्रामसभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, सरपंच श्रीनाथ थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, माधव थोरात, बाळासाहेब मंडलिक, दत्तात्रय काशीद, ग्राम पंचायत सदस्य सुमित काशीद, सुरेखा थोरात, छाया काशीद यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यत संपूर्ण राज्यामध्ये अभियान सेवा सप्ताह म्हणून राबवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देत सर्व समावेशक प्रगती साधण्यासाठी सर्व ग्रामपंचायतनी या अभियानात सहभागी व्हावे आणि आपल्या गावाचा विकास साधावा. असे आवाहन केले.