‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी १ कोटींचा निधी मिळणार - आमदार अमोल खताळ
◻️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा
संगमनेर LIVE | राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगर पंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यान विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने घेतला आहे. हे नमो उद्यान उभारण्यासाठी संगमनेर नगर परिषदेला एक कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे. या निधीतून शहरात उत्कृष्ट दर्जाचे नमो उद्यान’ उभारले जाणार आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त नमो उद्यान उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उप मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सुधारीत निकषांनुसार राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एका वर्षभरात हे नमो उद्या विकसित करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यात संगमनेर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला असून शहरातील नागरिकांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त असे ‘नमो उद्यान’ उभारले जाणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
नमो उद्यान उभारणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रथम क्रमांक पाच, द्वितीय क्रमांक तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये असे बक्षीस जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना वरील रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने ‘नमो उद्यान’ या उभारण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेला एक कोटी रुपयाचा निधी जाहीर केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो. या विशेष निधीतून नमो उद्यान उभारले जाणारे हे उद्यान शहरातील नागरिकांसाठी विश्रांती, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नवे केंद्र ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.