उद्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचा शुभारंभ
◻️ सभापती शिंदे, पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार
संगमनेर LIVE (राहाता) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ उद्या गुरुवारी राहाता येथे होणार असून शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे वितरण लाभार्थीना करण्यात येणार आहे.
शहरातील कुंदन लाॅन्स मध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास सभापती राम शिंदे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न व्हावा यासाठी सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महसूल विभागाच्या वतीने पानंद रस्ते जिवंत सातबारा योजनेतील लाभार्थीना तसेच शासनाच्या विविध योजनाच्या लाभार्थीना मंजूर योजनेचे पत्र तसेच दाखले वितरीत करण्यात येणार आहेत. कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्याना मंजूर झालेल्या योजनेतील औजारे वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.