आयआयआरएफ रॅकिंग मध्ये डॉ. विखे पाटील महाविद्यालयाचा सन्मान
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | नवी दिल्ली येथील आयआयआरएफ रॅकिंग २०२५ मध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगने भक्कम कामगिरी करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. भारत भरातील ५ हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक नर्सिंग महाविद्यालयात ८९ वा क्रमांक, महाराष्ट्रातील ६५० पेक्षा अधिक नर्सिंग कॉलेजेसमध्ये १४ वा क्रमांक तर झोनल स्तरावर १६ वा क्रमांक मिळवून संस्थेने गुणवत्तापूर्ण शैक्षणिक ध्येयधोरणाचे दणकट उदाहरण घालून दिले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन कार्य, उद्योग संवाद व प्लेसमेंट यांसारख्या महत्त्वपूर्ण निकषांवर आधारित मूल्यमापनात या यशाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अव्वल कॉलेजेसमध्ये स्थान पटकावणे ही संस्थेच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि शिस्तबद्ध वाटचालीची प्रचिती आहे.
संस्थेच्या यशामागे प्राचार्या डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर यांचे प्रभावी नेतृत्व, सर्व अध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थिनींची निष्ठा आणि समर्पणाचा मोलाचा वाटा आहे. समाजसेवा, व्यावसायिक प्रामाणिकपणा, राष्ट्रसेवेचा ध्यास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही संस्थेची जीवनमूल्ये असल्याचे प्राचार्या चांदेकर यांनी सांगितले.
या यशाबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. अभिजित दिवटे, तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे अभिनंदन केले.
दरम्यान गुणवत्तेला प्राधान्य, समर्पणातून यश आणि समाजसेवेच्या बळावर घडवलेला हा सन्मान संस्थेच्या उज्ज्वल भविष्यास नवे दालन उघडणारा ठरला आहे. असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.