संगमनेर शहरातील मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या आरतीवरून नाराजी नाट्य
◻️ मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरेंनी दिले स्पष्टीकरण
संगमनेर LIVE | यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरून निर्माण झालेल्या वादावर मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव (आप्पासाहेब) खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवीन लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांनी मानपत्रावरून नाराजी व्यक्त करत मिरवणुकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद समोर आला होता.
रंगारगल्लीतील १३० वर्षाची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दरवर्षी मानाच्या गणपतीला उपस्थित असतात किंबहुना त्यांच्या हस्तेच संगमनेरच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होतात.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते. संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळाने दोन्ही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती.
दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती व्यवस्थित पार पडली. मात्र, त्यानंतर मानपत्रावरून वाद सुरू झाला. खरे यांच्या वडिलांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘शिल्पकार सुंदरराव गोविंदराव मिस्त्री कला प्रतिष्ठान’ तर्फे दरवर्षी कला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. यावर्षीही हिंदू राजा प्रतिष्ठान आणि देवी गल्ली गणेशोत्सव मंडळाला सन्मानपत्र देण्यात येणार होते.
हिंदू राजा प्रतिष्ठानचे मानपत्र बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि देवी गल्ली गणेशोत्सव मंडळाचे मानपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दिले जाणार होते. मात्र, खताळ यांनी हे मानपत्र एका कार्यकर्त्याच्या हातात फेकून दिले आणि 'माझा अपमान झाला' असे सांगत मिरवणुकीतून निघून गेले.
या संपूर्ण घटनेवर बोलताना खरे यांनी स्पष्ट केले की, विसर्जन मिरवणुकीला कोणाला बोलवायचं हा पूर्णपणे मंडळाचा अधिकार आहे, ती कोणतीही प्रशासकीय बाब नाही. मानपत्राचा सन्मानही प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जातो आणि तो कोणत्याही आमदारांना दिला जात नाही. सोमेश्वर मंडळाने कोणालाही मानपत्र दिलेले नाही. यापुढेही देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीला लागणारा मोठा वेळ लक्षात घेता मंडळाने २००२ पासून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेत विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात केली, तेव्हापासून त्यांना आरतीला बोलावले जात असल्याचे स्पष्ट करत खरे यांनी सांगितले की, मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या आरतीचा मान कधीही आमदारांना दिला जात नाही. यापूर्वी गल्लीतील रहिवासी असलेले बी. जे. खताळ पाटील मंत्री असतानाही त्यांना या आरतीसाठी बोलावले गेले नव्हते. 
आमदारांच्या हस्तेच मिरवणूक निघायला पाहिजे, असा कोणताही नियम नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सर्वांचे मित्र आहेत त्यांनी संगमनेर मध्ये अत्यंत चांगल्या परंपरा सुरू केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी अगदी मंत्री असताना सुद्धा ते मानाच्या गणपतीच्या आरतीला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे झालेली घटना गैरसमजातून घडली असून, आमदार खताळ यांनी ती समजून घ्यायला हवी होती, असे मत आप्पासाहेब खरे यांनी व्यक्त केले. 
दरम्यान येत्या वर्षात आमदारांना विसर्जन मिरवणुकीसाठी बोलावले जाईल की नाही, याचा निर्णय मंडळ घेईल, असेही खरे यांनी शेवटी स्पष्ट केले.
 
