नूतन आमदारांशी बरोबरी करण्याचा घृणास्पद प्रकार - अ‍ॅड. श्रीराम गणपुले

संगमनेर Live
0
नूतन आमदारांशी बरोबरी करण्याचा घृणास्पद प्रकार - अ‍ॅड. श्रीराम गणपुले
 

◻️ मानाच्या पहिल्या गणरायाच्या आरतीवरुन सुरु असलेले दावे भाजप नेत्यांनी खोडले



संगमनेर LIVE | संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाच्या पहिल्या गणरायाच्या आरती वरुन विरोधकांकडून सुरु असलेले दावे खोडताना भाजपचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.

याबाबत भाजपचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मानाच्या गणपतीच्या आरतीवरुन सुरु झालेल्या चर्चेवर भाष्य केले. विसर्जन मिरवणुकीत घडलेला प्रकार विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने मांडला जात असून त्यामागील वास्तव नागरिकांसमोर येण्याची आवश्यकता व्यक्त करीत अ‍ॅड. गणपुले यांनी ‘बाळासाहेब थोरात तुम्ही विसरलात आणि गुरुवर्य आप्पासाहेब खरे आपण चुकलात’ अशा शब्दात दोन्ही घटनांचा समाचार घेतला. 

यावेळी त्यांनी २०१२ साली राज्यातील भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत आलेल्या गणेशोत्सवाचा हवाला देत त्यावेळी विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी घेवून आपल्यासह तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप पुंड, राधावल्लभ कासट, किशोर पवार, सोमेश्‍वर दिवटे, कैलास वाकचौरे व नितीन अभंग यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तथा तत्कालीन मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेचा दाखला त्यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.

त्यावेळी संगमनेरच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगरला जावून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी त्यावेळी नियोजित असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन विसर्जनाचा दिवस समोर ठेवून सोडल्यास दोन्ही गोष्टी साध्य होतील अशी सूचना केली होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी थेट नगराध्यक्षांची अक्कलच काढल्याने संगमनेरात विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी असावे यासाठी आंदोलन उभे करावे लागल्याची आणि त्याचे नेतृत्वही ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे यांनी केल्याची आठवण करुन दिली.

त्यावेळच्या आंदोलनामुळे अनंत चतुदर्शीला संगमनेरातील गणपतींचे विसर्जन होणार नसल्याचे चित्र समोर आल्यानंतर तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वरील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावल्याचा दावा करताना अ‍ॅड. गणपुले यांनी त्यावेळी मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत नेमके काय झाले होते याची आठवण करुन देण्याची वेळ आल्याचे सांगत खळबळ उडवणारा दावाही केला. 

या चर्चेत थोरात यांनी आपणास अपेक्षेपेक्षा खूपकाही राजकीय यश मिळाल्याचा उल्लेख करीत संगमनेरच्या गणेश विसर्जनात कोणतेही विघ्न येवू नये. आमदारांनी यावं, मानाच्या गणपतीची आरती करावी आणि उत्साहात मिरवणूक सुरु व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत ‘भविष्यात आपण आमदार असो अथवा नसो. त्यावेळीही आपण आरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, आरतीचा पहिला मान मात्र त्यावेळच्या आमदारांचा असेल‘ असे वक्तव्य त्यांनी केले होते. असा दावाही अ‍ॅड.गणपुले यांनी केला.

थोरात यांच्या याच वक्तव्यावरुन निशाणा साधत अ‍ॅड. गणपुले यांनी राजकियदृष्ट्या आमदार म्हणून संगमनेरच्या जनतेने तुम्हाला नाकारलंय, हा पराभव तुम्ही स्वीकारला आहे, असे व्यासपीठांवरुन जरी सांगत असलात तरीही तुमच्यासह तुमच्या समर्थकांना अजूनही हा पराभव पचलेला नाही. त्यातूनच अशा प्रकारची षडयंत्र रचली जात असून नूतन आमदारांशी बरोबरी करण्यासाठी अतिशय घृणास्पद प्रकार सुरु असल्याचे गणपुले म्हणाले. 

यावर्षी आरतीसाठी पहिल्यांदाच दोन ताटं करण्याच्या प्रकरणाचा समाचार घेताना त्यांनी गेल्यावर्षी पर्यत आमदारांसाठी एकच आरतीचे ताट करण्याची परंपरा असल्याकडेही लक्ष वेधले. यावेळी दोन ताटं तयार करण्याच्या कृतीवर खरमरीत टीका करीत त्यांनी थोरात यांना उद्देशून आपले वय, चाळीस वर्षाच्या आमदारकीचा, मंत्रीपदाचा प्रदीर्घ अनुभव पाहता आपण मनानेही मोठे व्हायला हवे होते, असे सांगत माजीमंत्री थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. 

आपण मोठ्या मनाने आरतीचे एकच ताटं करा, जो आमदार असेल त्याच्या हस्ते पहिली आरती होईल असे सांगीतले पाहिजे होते, मात्र आपण आपलीच संस्कृती समजून माजी आमदार असतानाही दुसरे ताटं हातात घेवून जो नवा दंडक घालण्याचा व प्रथा-परंपरा मोडण्याचा घाट घालीत आहात तो अतिशय चुकीचा असल्याची टीकाही अ‍ॅड. गणपुले यांनी केली.

दोन ताटांद्वारे आजी-माजी आमदारांकडून पहिल्यांदाच झालेल्या आरतीवरुन निर्माण झालेल्या अभूतपूर्व प्रसंगावर भाष्य करीत सोमेश्‍वर रंगारगल्ली मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आप्पासाहेब खरे यांनी सारवासारव करताना आरतीला कोणाला बोलवायचे याचा सर्वाधिकार मंडळाकडे असल्याचे वक्तव्य केले होते. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अ‍ॅड. गणपुले यांनी त्याचाही जोरदार समाचार घेतला. 

‘आप्पा, तुम्ही चुकलातच..’ असे म्हणत आरतीसाठी कोणाला बोलवावे याचा अधिकार मंडळालाच आहे, मात्र सोमेश्‍वर मंडळाचा गणपती एकट्या रंगारगल्लीचा नसून तो संपूर्ण शहराच्या गणेशोत्सवातील मानाचा पहिला गणपती आहे याचे स्मरण त्यांनी करुन दिले. म्हणूनच या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची पहिली आरती आमदारांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे व हा दंडकही आपणच घालून दिल्याची आठवणही त्यांनी प्रसिद्धीपत्रातून करुन दिली आहे.

आरतीचा मान कोणत्याही ‘व्यक्तिला’ नसून ‘पदाला‘ आहे. मंडळ कोणालाही आरतीसाठी निमंत्रण देवू शकते. परंतु पहिल्या आरतीचा मान त्या-त्या वेळच्या स्थानिक आमदारांनाच दिला जायला हवा. परंतु गुरुवर्य आप्पासाहेब, तुम्ही ती परंपरा मोडलीत आणि आता त्याचे लंगडे समर्थन करीत आहात, ते पाहुन इतकेच सांगावे वाटते, आप्पा, तुम्ही चुकलात.. असे अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !