चाळीस वर्षापासून प्रलंबित शहरातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत!
◻️ आमदार खताळ यांचा उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री विखे पाटील यांच्याकडील पाठपुरावा यशस्वी
संगमनेर LIVE | संगमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स. न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या हा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नुकतेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिल्याने ४० वर्षाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नांसाठी आमदार अमोल खताळ यांचा मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठ पुरावा सुरू होता. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे संगमनेर करांचा ४० वर्षांचा भूविवादाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच ढोलेवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.
संगमनेर बु।। येथील सिटी सर्वे नं. १६५० ई या मिळकतीवरील सत्ताप्रकार ब नोंदी काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांना कायदेशीर व्यवहार करताना येणारे अडथळे भविष्यात दूर होणार आहेत. तसेच गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर व राजापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची कार्यवाहीही सुरू झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. याचबरोबर, संगमनेर बु।। येथील सर्वे नं. १०४, १०५ व २१९ या जमिनींवरील मणियार कुटुंबाच्या खोट्या कब्जेदार नोंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या गोर गरिबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळणार आहेत.
शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स. न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याबाबत आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाबाबत सकारात्मकता दाखवली होती.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आमदार अमोल खताळ यांना या आरक्षणावर मार्ग काढणार असल्याचे आश्वस्त केले आहे.
काही नेते याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत, पण ‘ये पब्लिक हे सब जानती है’ की वस्तुस्थिती काय आहे, यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच ४० वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.