भोजापुर चारी आम्ही केली, तुमचे योगदान काय? - बाळासाहेब थोरात
◻️ ३५ वर्षे खासदारकी असताना चारीचा एक खडा तरी उचलला का?
◻️ नान्नज दुमालासह परिसरासाठीच्या पाणीपुरवठा योजना कोणी रद्द केल्या?
संगमनेर LIVE | दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. कारखान्याने या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी खर्च केला. तसेच आपण जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी निधी मिळवला. चारीचे काम पूर्ण झालेले होते. चारी आम्हीच केलेली आहे. सुदैवाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पाणी आले त्यात तुमचे योगदान काय? आयत्या पिठावर रेघोट्या ओढता. काम न करता खोट्या- नाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता असा थेट सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात यांच्या सह सर्व संचालक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी केली गेली. त्यावेळी संगमनेर व प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून ही चारी करायची होती. पूर्वेच्या लोकांनी याकडे पाहिले सुद्धा नाही. आपल्या कारखान्याने ८० लाख रुपये खर्च केला. चारी तयार झाली आपण जलसंधारणमंत्री झाल्यानंतर वेळोवेळी निधी मिळवला. चारी तिगाव माथ्यापर्यंत नेली. महाविकास आघाडी काळामध्ये शंकराव गडाख जलसंधारण मंत्री असताना पुन्हा दोन कोटी बारा लाख रुपयांचा निधी मिळवला. चारी पूर्ण तयार केली. पावसाळ्यामध्ये दरवर्षी चारीची देखभाल दुरुस्ती कारखान्याने केली. पाणी आधी देवकवठ्यापर्यंत पोहोचले. ही चारी काही आठ महिन्यांमध्ये झाली नाही. यासाठी काम करावे लागले.
तुमच्याकडेही ३५ वर्षे खासदारकी होती. तुमच्याकडून या चारीचा एक खडा तरी उचलला गेला का? असा सवाल करताना खोट्या - नाट्या गोष्टीं सांगून क्रेडिट घेऊ नका असे सुनावले. सुदैवाने यावर्षी मे महिन्यातच पाऊस चांगला झाला. पाऊस चांगला असल्याने सिन्नर तालुक्याला पाण्याची कमी गरज होती. पाणी लवकर आले आम्हाला त्याचा आनंद आहे. पण ही चारी काही आठ महिन्यात झाली नाही तर त्यासाठी आम्ही कष्ट केलेत. भोजापुर चारी आम्ही केली असे सांगताना निळवंडे कालव्यावरून नान्नज दुमाला व वरील गावांसाठी तीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. त्या कुणी रद्द केल्या असा सवाल त्यांनी विचारला. याचबरोबर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. या रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिली. यातील ४० कोटींचा निधी हा दुसऱ्या तालुक्यात नेला गेला हे कसे काय झाले.
अनेक दिवसांच्या परिश्रमातून हा तालुका उभा केला आहे. सुसंस्कृत राजकारणाची पद्धती आपली आहे. विरोधकांनाही संस्था उभ्या करण्यात आपण मदत केली आहे. कधीही कुणाची अडवणूक केली नाही. कुणाच्या वाट्यात काट्या टाकल्या नाही. निवडणूक संपली राजकारण संपले ही आपली परंपरा राहिली. मात्र आता मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यात खोट्यानाट्या केसेस टाकल्या जात आहेत. ३५३, ३०७ सारखे भयानक गुन्हे नोंदवले जात आहेत. आज छळ करून कार्यकर्त्याना धमकावले जात आहे. तालुक्याची विकासाची घडी त्यांना विसकोटायची असून नवीन लोकप्रतिनिधी हत्यार होऊन तालुक्याचे नुकसान करू नये असे सांगताना चाळीस वर्षाच्या कष्टातून हा तालुका उभा केला आहे.
आज संगमनेर तालुक्याचा लौकिक राज्यभर आहे. येथील शिक्षण, सहकार, समृद्ध बाजारपेठ, वैभवशाली विकास, सुरक्षितता, शांतता आणि समृद्धता राज्याला आदर्शवत आहे.याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे.एका दिवसात हे झालेले नाही. त्यासाठी कष्ट करावे लागले संघर्ष करावा लागला काम करावे लागले.
सोशल मीडियावर खोट्या नाट्या पोस्ट टाकल्या जात आहे. खोटे व्हिडिओ टाकले जात आहे. चांगला विचार करा. केलेले कामे इतिहास व संघर्ष विसरु नका. कुणाच्या तरी सांगण्यावरून तालुक्याच्या विरोधी हत्यार होऊ नका असे आवाहन करताना हा विकासाचा लौकिक आपल्याला टिकवायचा असून अशांतता निर्माण करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे आवाहन ही त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. पाण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. आज तालुका समृद्ध आहे तो लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे यापुढील काळातही आपल्या सर्वांना त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे असल्याचे ते म्हणाले.
नान्नज दुमालासह परिसरासाठीच्या पाणीपुरवठा योजना कोणी रद्द केल्या?
तालुक्यातील प्रत्येक गावाला व शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आपण सातत्याने काम केले. पुढील काळातही निळवंडे कालव्याचे पाणी सर्व शेतकऱ्यांना शेततळ्यामधून वर्षातून तीनदा तरी देता येईल असे नियोजन आपण केले होते. नान्नज दुमाला, निमोन या परिसराला पाणी देण्याकरता तीन उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र सरकार बदलले आणि त्यांनी या योजना रद्द केल्या. या योजना का रद्द केल्या? असा सवाल विचारताना त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेकांवर खोटे गुन्हे टाकले जात आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन एकजुटीने मुकाबला करा असे आवाहन केले.