संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रगण्य- बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रगण्य- बाळासाहेब थोरात

◻️ कृषी उत्पन्न बाजार समिती २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



संगमनेर LIVE | शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा याकरता यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समिती ही संकल्पना संपूर्ण देशात राबवली गेली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, व्यापारी या सर्वांना अत्यंत चांगल्या सुविधा देताना जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याबरोबर राज्यात अग्रक्रम मिळवला असल्याचे गौरवउद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

कारखाना कार्यस्थळ येथे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकर खेमनर होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीतत तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले आदी यावेळी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, व्यापाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा म्हणून मध्यस्थीची भूमिका असणारी बाजार समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केली. ही कल्पना पुढे देशभर राबवली गेली. संगमनेर तालुक्याच्या बाजार समितीने कायम शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. 

वडगावपान, साकुर, आंबी दुमाला, निमोन येथे उपबाजार निर्माण केले आहेत. आधुनिक सुविधा पुरवले आहेत. शेतकऱ्यांनी यापुढे आपला शेतमाल हा बाजार समितीत विकावा असे आवाहन करताना केंद्र सरकारने मागील वर्षी तीन काळे कायदे केले या कायद्याविरोधात उत्तर भारतात मोठे आंदोलन झाले म्हणून ते कायदे रद्द केले. अन्यथा बाजार समित्या रद्द झाल्या असत्या. असे सांगताना बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगले काम केले असून जिल्ह्यात प्रथम व राज्यात आपला मोठा लौकिक निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. त्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. या करता बाजार समिती, शेतकी संघ या सुविधा असून राज्यामध्ये अनेक बाजार समिती अडचणीत आले आहे. मात्र, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बाजार समितीने नाशिक विभागात व जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम ठेवला असल्याचे ते म्हणाले.

शंकर खेमनर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वडगावपान येथील सोळा एकर जागा बाजार समितीने घेतली असून त्या ठिकाणी विकासाची कामे सुरू आहेत. एक हजार टन साठवणक क्षमता असलेली गोडाऊन त्या ठिकाणी बांधले जात आहे. या ठिकाणी असलेल्या शेतमालाला तारण म्हणून कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आंबी खालसा येथे १५ एकर जागा शेतमाल खरेदी विक्रीसाठी घेतली आहे. निमोन येथेही दोन एकर जागा कांदा मार्केट साठी सुरू केली असून लूज कांदा वडगाव पान येथे सुरू आहे. 

यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी दोनशे रुपयांचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या बाजार समितीमध्ये उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार हा सरकारने करावा अशी मागणी करताना संगमनेर बाजार समितीने अत्याधुनिक सॉफ्टवेअर घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने बाजार भाव कपातीची माहिती मिळत असल्याचे सांगितले.

दरम्यान यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, शेतमाल उत्पादक, व्यापारी, आडतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या नोटीसचे वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले तर, अनिल घुगे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !