मन, मनगट आणि मस्तिष्क सक्षम करण्याचे काम मांचीहिल संकुलात - हभप परांजपे
◻️ मांचीहिल शैक्षणिक संकुलात आनंदसागर अध्यात्मिक अध्ययन केंद्राचे उद्घाटन
◻️ महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्याकडून शैक्षणिक आणि अध्यात्मिक कार्याचा गौरव
संगमनेर LIVE (आश्वी) | शिक्षण, अध्यात्म, नीती या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे मन, मनगट आणि मस्तिष्क सक्षम करण्याचे काम मांचीहिल शैक्षणिक संकुलात सुरु आहे. तसेच, अर्थार्जन करता - करता समृध्द जीवनाचा वस्तूपाठ या संकुलात विद्यार्थ्याना अनुभवण्यास मिळत असल्याने येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा आपल्या पालकाबरोवर या संकुलाचा देखील नावलौकिक वाढवेल. असे गौरवोद्गार कीर्तनचंद्रिका हभप रोहिणीताई परांजपे यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलात शुक्रवारी (१२ सप्टेंबर) आनंदसागर अध्यात्मिक अध्ययन केंद्राचे उद्घाटन वरदविनायक विनायक सेवाधामचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी हभप रोहिणीताई परांजपे (पुणे), अॅड. शाळीग्राम होडगर यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप रोहिनीताई परांजपे पुढे म्हणाल्या की, मानवाच्या कल्याणाची कामना संतांनी केली असल्यामुळे संत साहित्याचा आणि विचारांचा अभ्यास आणि जागर झाला पाहिजे. माणसाने कितीही भौतिक प्रगती केली आणि शिक्षण घेतलं तरी, अध्यात्मामुळेचं तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने पुर्णत्व प्राप्त होईल. ज्या प्रमाणे एखादा मुर्तीकार दगडातून छिन्नी आणि हातोड्याच्या माध्यमातून मुर्ती तयार करुन तिच्यापुढे नतमस्तक होतो. त्याचंप्रमाणे आपला देखील प्रवास मनुष्याकडून देवात्वाकडे करायचा असल्यास घाव सोसावे लागतील. असे मौलिक मार्गदर्शन केले.
दरम्यान कीर्तन समाप्तीनंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सुंदर अध्यात्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अॅड. शाळीग्राम होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मांचीहिल संकुलात शिक्षणाची गंगा वाहती झाली आहे. आज जगभरात वाईट प्रवृत्ती वाढत असून त्याला अध्यात्माच्या माध्यमातूनचं उत्तर देता येईल. शिक्षणाच्या या नंदनवनात शैक्षणिक ज्ञानाबरोबर अध्यात्मिक ज्ञानाची सांगड घातली जात आहे. तसेच विद्यार्थ्यानी संस्कृतचा अभ्यास केल्यास त्यांचे उच्चार, भाषा आणि बुद्धीची क्षमता वाढण्याबरोबर विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल. असे सांगताना महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी मांचीहिल संकुलातील शैक्षणिक आणि अध्यात्मिक कार्याचा गौरव केला.