शक्य नसेल तेथे ड्रोनच्या साह्याने पंचनामे करा - पालकमंत्री विखे पाटील
◻️ खडकत बंधाऱ्यासाठी मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली
संगमनेर LIVE (जामखेड) | जामखेड तालुक्यातील खडकत बंधाऱ्याच्या कामासंदर्भात सोमवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेवून महत्वपूर्ण निर्णय घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे खडकत बंधारा पाण्याच्या फुगवट्यामुळे वाहून गेला. या बंधाऱ्यांची पाहाणी मंत्री विखे पाटील यांच्यासह आ. सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांच्यासह महसूल जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीने नदिपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला. क्षमतेपेक्षा जादा पाणी साठा झाल्याने खडकत क्र १ कोल्हापुरी बंधाऱ्यालगतचा मातीचा भराव वाहून गेला.
मंत्री विखे पाटील यांनी आजच्या पाहाणी दौऱ्यात या बंधाऱ्याच्या दरवाज्यांची दुरूस्ती तसेच मातीचा भराव यांत्रिकी विभागामार्फत पुर्ववत करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील धनेवाडी मोहरी येथील बंधाऱ्याच्या झालेल्या नूकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी सांयकाळी उशिरा पर्यत केली. ठीक ठिकाणी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पंचनामे करताना हलगर्जीपणा करू नका. पाण्यामुळे शेतात जावून पंचनामे करणे शक्य नाही. त्यासाठी ड्रोण तंत्रज्ञानाचा उपयोग करा यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.