संगमनेर तालुक्यातील खळी येथे आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू
◻️ आंघोळीसाठी तापवलेले पाणी सांडले होते अंगावर
◻️आजीची आठ तर, नातवाची पंधरा दिवसांची झुंज ठरली अपयशी
संगमनेर LIVE | अंघोळीसाठी तापवलेले गरम पाणी अंगावर साडल्यामुळे गंभीररित्या होरपळलेल्या आजी आणि नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील खळी शिवारात घटना घडली असून ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास खळी शिवारातील कांगणवाडी येथील सिंधुबाई नामदेव सोसे (वय - ५२) आणि त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय - ५) यांच्या अंगावर अंघोळीसाठी तापवलेले गरम पाणी सांडले होते. त्यामुळे आजी आणि नातु दोघेही जवळपास ६० टक्के भाजले होते. यामध्ये पाठीचा भाग आणि पाय गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना जीवनाशी सुरू असलेला संघर्ष ८ दिवसांनी म्हणजे सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला. तर, मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी नातू राहुल प्रकाश सोसे याची देखील प्राणज्योत मालवली आहे. आजी आणि नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे खळी सह पंचक्रोशीतील गावे आणि संगमनेर तालुक्यात देखील शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच नातेवाईकांसह कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी घरी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
दरम्यान सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, मुलगा प्रकाश सोसे, योगेश सोसे, दोन सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.