अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात १० वा ‘आयुर्वेद दिवस’ उत्साहात साजरा
◻️ माजी विद्यार्थ्याचा ‘अश्विन गौरव पुरस्कार २०२५’ देऊन सन्मान
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात आयुष विभाग व आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्गदर्शनाखाली दि. १५ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रम राबवून आयुर्वेद सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ रन फॉर आयुर्वेद वाकेथान ने करण्यात आला. यामध्ये सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुढील प्रत्येक दिवशी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुर्वेदीय जनजागृती फेरी, आरोग्यासाठी योग प्रशिक्षण, मेडीटेशन, पथ्या-अपथ्य, दुर्मिळ औषधी वनस्पती प्रदर्शन व जनजागृती, आयुर्वेदीय आहार प्रदर्शन, पथनाट्य, सर्व रोगनिदान शिबीर, शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी १० वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने महाविद्यालयात धन्वंतरी याग संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. मंदार भणगे व डॉ. सौ. दीपा भणगे उपस्थित होते. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात महाविद्यालयात पहिला प्रवेश घेणारे माजी विद्यार्थी व पुणे येथील प्रथितयश आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य. मेहबूब पटेल यांना आयुर्वेद क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल ‘अश्विन गौरव पुरस्कार-२०२५’ आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, मुख्य अधिकारी डॉ. संजीव लोखंडे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी व डॉ. नितीन आहेर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. शाळीग्राम होडगर म्हणाले की, “महाविद्यालयात पहिला प्रवेश घेणारा विद्यार्थी नावलौकिक कमावून आपल्याच मातृ महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून येण हि अत्यंत गौरवशाली बाब आहे.” तसेच आयुर्वेद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना त्यावेळची परिस्थिती आणि आज महाविद्यालयाला २५ वर्ष पूर्ण होतानाची परिस्थिती हा सर्व घटनाक्रम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितला.
वैद्य. मेहबूब पटेल म्हणाले की, आयुष्यभराची ज्ञानाची शिदोरी मी येथून घेऊन गेलो. आजपर्यत यश संपादन करत असताना कोठेही मागे वळून बघाव लागल नाही. आपण स्वतः ठरवा आपल्याला काय व्हायचं. त्यासाठी जिद्दीन अभ्यास करा. कर्माला दोष न देता जे मिळाल त्यात प्रामाणिकपणाने कष्ट करत रहा यश तुमच्या पायाशी असेल. अशा भावना व्यक्त केल्या.
दरम्यान यावेळी डॉ. संजीव लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियंका आढाव, प्रास्ताविक डॉ. जितेंद्र शिंपी, पाहुण्यांचा परिचय डॉ. अविनाश जाधव यांनी करून दिला. तर, आभार प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी संसद यांनी विशेष परिश्रम घेतले.