शेतकरी बांधवांना शक्ती आणि सरकारला सरसकट कर्जमाफी करण्याची सदबुध्दी दे!
◻️ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची सप्तशृंगी देवीचरणी प्रार्थना
संगमनेर LIVE | शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला शक्ती दे व सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद समाधान निर्माण होऊ दे. अशी प्रार्थना ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सप्तशृंगी देवी चरणी केली.
संगमनेर येथील देवी गल्ली येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी महाआरती केली. यावेळी डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, नवरात्र उत्सव हा भारतातील समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. हे आनंदाचे पर्व आहे. महिला शक्तीचा जागर यानिमित्ताने आपण करत असतो. महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे. सर्व लोक मोठ्या श्रद्धेने जगदंबा मातेचे दर्शन घेत असतात. यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला मात्र उत्तरार्धात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला आहे. अनेकांचे पशुधन मृत पावली आहे तर शेती खचली आहे. उभे पिके वाहून गेली आहे. अशा संकट काळामध्ये या शेतकऱ्याला सावरण्याची शक्ती दे. अशी प्रार्थना करताना राज्य व केंद्र सरकारने शेतकरी बांधवाला तातडीने सरसकट कर्जमाफी करून मदत करण्याची सदबुध्दी द्यावी, अशी प्रार्थना जगदंबे चरणी केली.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, श्री शक्तीचा जागर नवरात्राच्या निमित्ताने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात होत आहे. पर्यावरण पूरक आणि आनंदाने हा उत्सव सर्वांनी साजरा करावा. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सरकार मात्र सुस्त असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान याप्रसंगी सौ. दुर्गाताई तांबे यांनी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन केले.