‘गुणवत्तापुर्ण’ शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत प्रवेश घ्या - विकास देशमुख
◻️ अश्वी इंग्लिश स्कूल येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयती उत्साहात साजरी
संगमनेर LIVE (आश्वी) | कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखापर्यत आता शिक्षण मर्यादित राहिलेले नाही. २० वर्षापूर्वी संगणक आले तेव्हा नोकऱ्या संपुष्टात येईल, असे म्हटले जात होते. त्याचप्रमाणें आता देखील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान विकसित झाल्याने नोकऱ्यावर संकट येईल असे म्हटले जात आहे. मात्र, भविष्यात जागतीक पातळीवर स्पर्धा करायची असल्यास ’एआय तंत्रज्ञाना’शिवाय पर्याय नाही. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरदचंद्र पवार आणि चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै पासून ५ वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ चा ६० तासांचा अभ्यासक्रम रयतच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ‘गुणवत्तापुर्ण’ शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा. असे आवाहन माजी सनदी अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु।। येथिल रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना विकास देशमुख बोलत होते. याआधी कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण होडगर होते. सुभाषराव म्हसे, सुमतीलाल गांधी, प्राचार्य डी. के. वडीतके, पर्यवेक्षक डी. पी. चव्हाण, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, बाळासाहेब गायकवाड, किरण बोरा, अभिषेक बोरा, सरपंच नामदेव शिंदे, राहुल जऱ्हाड, अनिल मुन्तोडे, वैभव ताजणे, ब्रिजमोहन बिहाणी, भाऊसाहेब गायकवाड, अस्लम शेख, केदार बिहाणी, गोरक्षनाथ बनकर, सुशील भंडारी, वंदनाताई नगरकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विकास देशमुख यांनी कर्मवीर अण्णांचा जीवनपट उलगडून दाखवताना सांगितले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण अवघे सहावी पर्यत झाले होते. परंतु ग्रामीण भागातील बहुजानासह गोरगरीबाच्या मुलं - मुलीना शिक्षण मिळवे यासाठी त्यांनी निःस्वार्थ भावनेतून रयत शिक्षण संस्थेच्या नावांचे रोपटे लावले. आज त्याचां वटवृक्ष झाला असून तो टिकवण्याचे आणि वाढवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हे बहुतांश शेतकऱ्यांची मुलं असतात. शेती हा नेहमी तोट्यातला व्यवसाय असल्याचे वास्तव मांडताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी कोणताही न्युनगड बाळगू नये. कारण परमेश्वराने बुध्दी देताना ग्रामीण किंवा शहरी असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम केल्यास यश तुमचेचं असेल. असे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्याना करताना त्यांनी शाळा, शिक्षक, देणगीदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक केले.
रिपाइंचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात मराठी शाळेची पटसंख्या कमी होत असताना ही एकमेव शाळा आहे की, जिची पटसंख्या दरवर्षी वाढत आहे. हेचं येथील शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेचे रहस्य आहे.
यावेळी देणगीदार अशोक बोरा यांनी या शाळेप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करत शाळेला काही सुचना करत विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला. दरम्यान हा सुंदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.