साकूर पठार भागातील मोबाईल टॉवर व फाईव्ह - जी सेवा लवकरच सुरू होणार
◻️ उपमुख्यमंत्र्यासह जियो कंपनीचा देखील आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील साकूर पठार व आसपासच्या डोंगराळ, आदिवासी भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कचा प्रश्न प्रलंबित आहे. डोळासणे, शेंडेवाडी, सतीचीवाडी, रणखांब, दरेवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, चौधरवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, वरशिंदे अशा गावांमधील सुमारे ३५ ते ४० हजाराहून अधिक नागरिक, विद्यार्थी आजही मोबाईल नेटवर्क व डिजिटल सेवांपासून वंचित आहेत.
या गंभीर समस्येबाबत आमदार अमोल खताळ यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा केली आहे. तसेच जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने टॉवर उभारणी व सेवांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पाठविलेल्या पत्रामध्ये साकूर पठार भागातील मोबाईल टॉवर उभारणी व फाईव्ह - जी सेवा सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले होते.
या संबंधित पत्र ई-मेलद्वारेही आमदारांनी कंपनीला पाठवले आहे. जिओ कंपनीकडूनही या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून “यावर तातडीने कार्यवाही केली जाईल" असे त्यांनी कळविले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
परंतु आता या प्रश्नावर विधानपरिषदेचे सदस्य श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार खताळ यांनी केला.
साकूर पठार व परिसरातील हजारो नागरिकांचा हक्काचा हा प्रश्न राजकारणासाठी नव्हे, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष संघर्ष, पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे आमदार अमोल खताळ पाटील करत आहेत.
आता हा विषय अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे काही जण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी, साकूर पठार व परिसरातील लोकांच्या हक्काच्या या प्रश्नावर तसेच पाणी प्रश्नावर आपण प्रामाणिकपणे लढा देत आहोत. असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
दरम्यान लवकरच या भागात मोबाईल टॉवर उभारणी व फाईव्ह - जी सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.