खा. निलेश लंके यांची गडकिल्ले संवर्धनाची मोहीम प्रेरणादायी - डॉ. जयश्री थोरात
◻️ गड किल्ले संवर्धन अभियानात तालुक्यातील १२०० युवक सहभागी
संगमनेर LIVE | अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले हेच खरे महाराजांचे स्मारके असून त्यांची जपवणूक करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या किल्ल्यांची स्वच्छता संवर्धन यासाठी खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेले अभियान हे संपूर्ण राज्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवउद्गार कॉग्रेसच्या युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी काढले.
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला विश्रामगड येथे खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून ‘आपला मावळा उपक्रमा’तून गड किल्ले संवर्धन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी खासदार निलेश लंके, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. प्रभावती घोगरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील १२०० युवक सहभागी झाले होते.
‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणासह ‘हर हर महादेव’, ‘आम्ही मावळे शिवबाचे’ या घोषणांनी सह्याद्रीचा परिसर दुमदुमला. हातात झाडू, टोकरी, खोरे, आणि खांद्यावर भगवा झेंडा घेऊन या तरुणांनी पट्टा किल्ला परिसर स्वच्छ केला. यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून १२०० युवक डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणादायी गीते गात पट्टा किल्ल्याकडे रवाना झाली. यानंतर तेथे दिवसभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. घरून नेलेली भाजी भाकरी खाऊन सर्व युवकांनी सह्याद्रीच्या कुशीमध्ये विश्रामगडावर स्वच्छता अभियान राबवून आपला दिवस संस्मरणीय ठरवला.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, खासदार निलेश लंके यांनी कोरोना संकटामध्ये अत्यंत प्रभावी काम केले. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या या युवा नेतृत्वाने भारताच्या संसदेमध्ये शेतकरी सर्वसामान्य यांच्यासाठी आवाज उठवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे खरे स्मारक असून या किल्ल्यांच्या संवर्धनाकरता त्यांनी सुरू केलेले अभियान हे राज्यातील सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव शिकवला याच विचारांवर महाराष्ट्राचे राजकारण सुरू होते. मात्र सध्या देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू झालेले जाती भेदाचे राजकारण हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाताना आपल्याला महाराष्ट्र आणखी बळकट करायचा असल्याचे त्या म्हणाल्या.
खासदार निलेश लंके म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन काम केले आहे. युवा पिढीतील १२०० तरुणांचा आपला मावळा उपक्रमात सहभाग हा समाज आणि असल्याचे सांगून महाराजांचा सर्व धर्म समभावाचा विचार आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, तरुणांच्या मनामध्ये जाती भेदाचे विष पेरण्यापेक्षा सर्व धर्म भावाचे अमृत पेरले पाहिजे. याकरता हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी संगमनेर तालुक्यातील १२०० युवकांनी दिवसभर श्रमदान करून आपला मावळा अभियान संस्मरणीय ठरवले.
गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे..
हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले गड किल्ले हे महाराजांचे खरे स्मारके आहेत. या स्मारकांची संवर्धनाची जबाबदारी ही सरकारची असून ती प्राधान्याने त्यांनी पार पाडली पाहिजे. असे सांगताना समाजातील प्रत्येकाचे मन सामर्थ्यवान करण्याचे ताकत असलेले हे गड किल्ले याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वाची असून त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी करुन अभियानाला शुभेच्छा दिल्या.