सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने जिल्हा हळहळला
◻️ न्याय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले - बाळासाहेब थोरात
◻️ डॉ. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी शोकभावना केल्या व्यक्त
संगमनेर LIVE | दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात विधीतज्ञ म्हणून कार्यरत असणारे आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये कायद्या समजावून सांगणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे नातू ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्याय क्षेत्रातील एक तडफदार व अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे. अशी भावना कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
हरितक्रांतीचे प्रणेते केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू व अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आणि थोरात परिवाराचे जवळचे नातलग ॲड सिद्धार्थ शिंदे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी समजतात संपूर्ण कायदे क्षेत्र व जिल्ह्यामध्ये हळहळ पसरली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, माझे मार्गदर्शक स्वर्गीय डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे नातू तथा सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. कायद्यावरील त्यांचे गहन ज्ञान आणि सखोल अभ्यास प्रत्येक चर्चेतून दिसून येत होता. साध्या सोप्या भाषेत त्यांची मांडणी ही सर्वाना सहज आकलन होत होती. महाराष्ट्रातील कायदेशीर मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी केलेली मांडणी अत्यंत लोकाभिमुख झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने कायदे क्षेत्रातील महाराष्ट्राचे एक तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सिद्धार्थ शिंदे यांचे निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभला होता. संविधानाविषयी त्यांचे ज्ञान आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवरील बारकाईची दृष्टी, यामुळे न्यायालयीन क्षेत्रामध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. गेल्या दशकांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. कायद्याची क्लिष्ट भाषा सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट करण्याची त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनाने एक विधीक्षेत्रासाठी समर्पित व्यक्तिमत्व गमावले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की माझे मामेभाऊ आणि सुप्रीम कोर्टातील यशस्वी कायदे तज्ज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या अकस्मात निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. ते माझे मार्गदर्शक आणि मित्र मित्रही होते. पहिली दिल्लीवारी मला २५ वर्षांपूर्वी त्यांनी करून दिली होती. आयुष्यातील पहिला प्रदेश प्रवास त्यांच्यासोबत झाला. अत्यंत हुशार अभ्यास आणि प्रेमळ मनाचे असलेले ॲड. शिंदे यांच्या निधनाने माझे मार्गदर्शक आणि कायदे क्षेत्रातील गहन ज्ञान असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले असल्याची भावना व्यक्त केली.
डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले की, अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये कायदे मांडणारे आणि सर्वाशी अत्यंत मनमोकळे वागणारे सिद्धार्थदादा यांचे आकस्मात जाणे हे अत्यंत दुःखदायक आहे.