तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
◻️ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा
संगमनेर LIVE (तुळजापुर) | शारदीय नवरात्र उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर विविध प्रशासकीय यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत त्यांनी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित तयारीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांची व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
३०० मोबाईल टॉयलेटची उभारणी..
तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात ३०० मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. यासोबतच आपत्ती व्यवस्थापनाच्या सहाय्याने स्वच्छता व आपत्कालीन उपाय योजनांचीही तयारी करण्यात आली आहे.
११७५ एसटी बसेसची व्यवस्था, आणखी ५० नवीन बसची घोषणा..
राज्य परिवहन महामंडळाने नवरात्रीदरम्यान भाविकांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी ११७५ एसटी बसेसची विशेष व्यवस्था केली आहे. यासोबतच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी ५० नवीन बस पुरवण्याची घोषणाही केली, ज्यामुळे भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील.
आरोग्य, वीज व सार्वजनिक बांधकाम विभागही सज्ज..
आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी देखील आपापल्या आघाड्यांवर तयारी पूर्ण केली आहे.
पालकमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक..
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सैनिकी विद्यालय येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शारदीय नवरात्र उत्सवामधील सांस्कृतिक महोत्सवाला राज्य सरकारने राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला आहे. पर्यटन विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात आयोजित होणाऱ्या महोत्सवांच्या दिनदर्शिकेत या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक तुळजापूरकडे येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून केली जाणारी ही पूर्वतयारी भाविकांना निश्चितच सुखकर आणि भक्तिमय अनुभव देणारी ठरेल.