आश्वी महाविद्यालयातील सोहम आव्हाड यांची पूर्व चाचणी संचलनासाठी निवड
◻️ निवड झाल्यास प्रवरेचा विद्यार्थी ‘प्रजासत्ताक दिना’च्या संचलनात होणार सहभागी
संगमनेर LIVE (आश्वी) | २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे ‘प्रजासत्ताक दिनी’ होणाऱ्या संचालनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन विद्यापीठ स्तरीय निवड चाचणी शिबिराचे नागपूर येथे आयोजन केले आहे.
या शिबिरात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक असलेला सोहम आव्हाड याची या चाचणी शिबिरासाठी निवड झाली आहे. तर, सोहम यांची या चाचणी शिबिरातून पुढे निवड झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ‘प्रजासत्ताक दिना’च्या संचलनात सहभागी होण्याची मोठी संधी त्याला मिळू शकते.
या निवड प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांनी सोहमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी देखील सोहमचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
दरम्यान या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. आदिनाथ घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह समन्वयक प्रा. दत्तात्रय लोखंडे, प्रा. गणेश खेमनर, अनुप कदम तसेच शिक्षक व शिक्षकेतर सेवक यावेळी उपस्थित होते.