बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आलेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे जलसमृद्धी
◻️ डाव्या व उजव्या निळवंडे कालव्यातून पाणी आल्याने तालुक्यात आनंदोत्सव
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात सततच्या विकास कामातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात अग्रगण्य बनवला आहे. तळेगावसह दुष्काळी भागाला शाश्वत पाणी मिळावे याकरता निळवंडे धरण व कालवे पूर्ण केल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. तालुक्यातील विविध दुष्काळ असलेल्या गावांची दुष्काळ मुक्ती होत असून उजव्या व डाव्या कालव्यातून आलेल्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये बांधारे भरल्याने जलसमृद्धी निर्माण झाली आहे.
देवकौठे ते बोटा असा मोठा विस्तीर्ण प्रदेश असलेल्या संगमनेर तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी साखळी बंधारे निर्माण करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली. याचबरोबर अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. यावर्षी मे महिन्यापासूनच चांगला पाऊस सुरू झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून सतत पाणी सुरू असल्याने तळेगाव भागातील लोहारे, कासारे, कवठे कमळेश्वर यांच्यासह विविध लगतच्या गावांमधील नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहे. तसेच उत्तरेकडील देवकौठे पर्यंतचे बांधावे भरले असून मलढोण, सायाळे, पाथरे पर्यत पाणी पोहोचले आहे. तर उजव्या कालव्यातून पिंपरणे, जाखुरी, कोळवाडे, डिग्रस अशा विविध गावांमधून पाण्याने बंधारे भरले आहेत. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित पाईपलाईनच्या माध्यमातून शेततळ्यांमधून पाणी उचलून शेती फुलविली आहे.
उजवा कालवा हा ९७ किलोमीटर लांबचा असून यामधील ६९ गावांमधून २०३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तर डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा असून ११३ गावांमधून ४३ हजार ८६५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. या दोन्ही कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील २५ हजार ४२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येत असून विविध गावांमधील नालाबर्डिग, शेततळे व बंधारे भरल्याने दुष्काळी भागांमध्ये जलसमृद्धी निर्माण झाली आहे. हे सर्व काम लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहे.
कालव्या लगतच्या गावांना चांगले पाणी मिळावे याकरता इंद्रजीतभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याच्या जेसीबी, पोकलेन, यंत्रणेने रात्रंदिवस काम केले असून शेतकऱ्यांना पाईप उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कालव्यांवरून थेट शेततळे व बंधारे व नालाबिल्डिंग मध्ये पाणी टाकण्यात आल्यामुळे अनेक गावांमध्ये बंधारे भरले आहेत. तालुक्यामधील ओढे नाले, यामध्ये पाईपांद्वारे पाणी टाकल्याने याचा लाभ त्या लगतच्या शेतकऱ्यांना होत आहे.
धरण व कालवे पूर्ण करण्यात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पूर्णपणे योगदान असून त्यांनी प्रसिद्धी न करता काम पूर्ण करून ठेवले. कारण प्रसिद्धी केले की अडचणी निर्माण होतात हे सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळे प्रसिद्धी न करता केलेल्या या मोठ्या कामाचा फायदा आज तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत असून गावोगावांमध्ये पाणी आले असल्याचे पिंपरणे येथील तरुण शेतकरी अरुण राहींज यांनी म्हटले आहे.
भोजापूर चारीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठे योगदान दिले. वेळोवेळी निधी मिळवला. यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने चारीला चांगले पाणी आले. ही चारी काही मागील आठ महिन्यात झाली नाही. या चारीचे काम हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच केले असून आता श्रेय घेणारे खूप आहेत त्यांना यापूर्वी चारीही माहीत नसल्याची टीका भोजापुर चारी समितीचे पांडुरंग फड यांनी केली आहे. या चारीतून पाणी आल्यामुळे बंधारे भरले असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.
निळवंडे धरण व कालवे हे काही मागील आठ महिन्यात पूर्ण झाले नाही. ही सर्व कामे बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केली आहे. त्यांनी ठरवले असते तर दर महिन्याला उद्घाटनाचा कार्यक्रम करून शो केला असता. परंतु काम पूर्ण करून जनतेला पाणी देणे हे त्यांचे स्वप्न होते. आज तळेगाव भागात पाणी आले. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. विविध गावांसाठी कारखान्यांने मोठी मदत केली. ४० वर्षात हा तालुका उभा करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हेच खरे निळवंडे धरणाचे जनक असून महाराष्ट्राचे व दुष्काळी भागातील जनतेसाठी प्रेरणादायी जलनायक आहेत. असे चिंचोली गुरंव चे सरपंच विलास सोनवणे यांनी म्हटले.