तुळजापुर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
◻️ पुण्यातील प्रवेश पेठकर यांच्या कडून श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याची साफसफाई
संगमनेर LIVE (तुळजापुर) | श्री क्षेत्र तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू असताना पुण्यातील धनकवडी येथील रहिवासी तसेच चांदीचे कुशल कारागीर प्रवेश पेठकर यांनी यावर्षीही आपली सेवा भावपूर्वक अर्पण केली आहे. मागील आठ वर्षांपासून ते श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील चांदीची साफसफाई विना मोबदला करत आहेत.
मंचकी निद्रेच्या कालावधीत गाभाऱ्यातील देवींचे चांदीचे सिंहासन तसेच दरवाज्यावरील चांदीची स्वच्छता करून गाभाऱ्यातील चांदीला चकाकी देण्याचे काम पेठकर पार पाडतात. गाभारा स्वच्छ व आकर्षक दिसावा, यासाठी ते गेल्या आठ वर्षांपासून ही सेवा करीत आहेत.
यावर्षीही त्यांनी अत्यंत मनोभावे गाभाऱ्यातील चांदीची पूर्णपणे साफसफाई करून गाभारा स्वच्छ केला आहे. त्यांचे हे कार्य मंदिर संस्थानतर्फे तसेच भाविकांकडून विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. प्रवेश पेठकर यांची ही अखंड सेवा परंपरा श्री तुळजाभवानी देवीप्रती असलेली त्यांची निस्वार्थ भक्ती अधोरेखित झाली आहे.