बांधकाम कामगारांकडून पैसे घेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार
◻️ आमदार अमोल खताळ यांचा इशारा; दीड हजार कामगारांना भांडी वाटप
संगमनेर LIVE | बांधकाम कामगारांचे प्रकरण तयार करण्यासाठी शासनाकडून कोणताही खर्च येत नाही. केवळ एक रुपया शुल्क शासनाला भरावा लागतो. तोही महायुती कार्यालयामार्फतच भरला जाईल. असे असतानाही बांधकाम कामगारांकडून कोणी पैसे घेत असेल तर, अशा व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करु. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्यातील १ हजार ५००बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त रेवननाथ भिसले, कामगार अधिकारी आप्पा चाटे, निरीक्षक प्रकाश भोसले, ललित दाभाडे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य व तळागाळातील शेवटच्या घटकापर्यत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केले जात आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा या भूमिकेतून पारदर्शकपणे योजना राबवल्या जात आहे. भविष्यात बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारचे आजार उद्भवल्यास शासनाच्या वतीने स्वतंत्र रुग्णालयाची निवड केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी शालेय शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जात आहे.
आत्तापर्यत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने तालुक्यातील ४० हजार ८३५ लाभार्थी पैकी ४ हजार ७५४ जणांना शिष्यवृत्ती दिली असून त्यावर आत्तापर्यंत राज्य सरकारकडून ४ कोटी ४१ लाख दिले गेले आहे. २० सप्टेंबरपर्यंत ६ हजार ८४० भांडी संच वाटप पूर्ण केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लवकरच ३ हजार बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप होणार असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.
बांधकाम कामगारा प्रकरणावर आता ग्रामसेवकाच्या सही शिक्क्याची गरज नाही तर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का आवश्यक आहे. तो जर तुम्हाला मिळत नसेल तर, महायुतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरा त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कॉन्ट्रॅक्टरची सही शिक्कासुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे येथून पुढील काळामध्ये तालुक्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी सूचना करुन येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन उपस्थिताना केले.
यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते रुपाली संतोष मंडलिक यांच्या पाल्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी ६० हजार, राजश्री सुनील थोरात यांच्या पाल्यांना पदविका/पदव्युत्तर शिक्षणासाठी २० हजार रुपये, दत्तात्रय विष्णू नेहे यांच्यापाल्यांना दहावी-बारावी शिक्षणासाठी १० हजार रुपये, संतोष तनपुरे यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याकरिता २० हजार रुपये, धनादेश बांधकाम कामगार लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी बांधकाम विषयक योजना विषयीची माहिती अहिल्यानगरचे सहाय्यक बांधकाम आयुक्त रेवांना डीसले यांनी दिली.